मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत वडगाव शेरी येथे बेकायदा दीड लाखांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत विशेष पथकाने वडगाव शेरी येथे छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल करत १ लाख ५९ हजार ८८० रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे.
यलप्पा तिरकप्पा शेट्टी (वय ३५, रा. टेम्पो चौक, सचिन नगर, वडगाव शेरी) आणि चंद्रकांत फुलचंद पटवा (रा. विद्यानगर, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
परिमंडळ ७ अंतर्गत बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यलप्पा शेट्टी हा गुटखा, तंबाखू व पानमसाल्याची विक्री करत असून त्याने त्याचा मोठा साठा करून ठेवला आहे.
या माहितीची खातरजमा करून पोलीस टेम्पो चौकात आले. तेथे यलप्पा शेट्टी मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने जवळच असलेल्या मोझेसवाडी येथील एका घरात गुटखा व पानमसाला लपवून ठेवल्याचे सांगितले.
खोलीचे कुलूप उघडून पोलीस आत गेले असता, पांघरुणाखाली गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ झाकून ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी १ लाख ५९ हजार ८८० रुपयांचा माल जप्त केला. हा माल चंद्रकांत पटवा याच्याकडून घेतल्याचे यलप्पा शेट्टी याने सांगितले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस हवालदार सुशिल बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे, पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे आणि लालू कर्हे यांनी केली.
नागरिकांना आवाहन
गुन्हेगारी टोळ्या, अवैध गुटखा विक्री, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार, शस्त्र बाळगणे किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्याबाबत माहिती असल्यास ती नि:संकोचपणे कळवावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी केले आहे.
पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार : ८८०२००७९३८
सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड : ९९२२७१७९९९
सहायक पोलीस निरीक्षक नितीन राठोड : ९९२२७४४५९९
