मतदार यादीत दुरुस्तीची बतावणी करून ज्येष्ठाची १२ लाखांची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मतदार यादीत तुमच्या वडिलांचे नाव मिसमॅच होत आहे, त्याची दुरुस्ती करायची आहे, अशी बतावणी करून सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची ११ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील रामबाग कॉलनीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मतदार नोंदणी यादीत ज्येष्ठ नागरिकाच्या वडिलांच्या नावात चूक झाली आहे. हे नाव बदलण्यासाठी पुन्हा अर्ज द्यावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून देण्यासाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे,’ अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली.
चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाचे आधारकार्ड, तसेच डेबिट कार्डची माहिती घेतली. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाइन पद्धतीने पाच रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्याने फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीच्या बँक खात्यातून ११ लाख ९७ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून डॉक्टरांची फसवणूक
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका डॉक्टरांची १३ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७८ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टर हे वानवडी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘एका खासगी बँकेतून बोलत असून, बँक खाते अद्ययावत करायचे आहे,’ अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पैसे काढले. चोरट्यांनी १३ लाख ६१ हजार रुपये दुसऱ्या खात्यात जमा केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड तपास करत आहेत.
