आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मार्केटयार्डमधून २५ लाखांचा मेफेड्रोन जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 28, 2026
Spread the love

पुणे : मार्केटयार्डमधील आनंदनगर वसाहतीतील एका घरावर मार्केटयार्ड पोलिसांनी छापा टाकला. या एकाच घरातून तलवार, कुर्‍हाड, देशी-विदेशी दारूचा साठा आणि २५ लाख रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केला आहे.

ओम कुंडलिक गायकवाड (वय २४, रा. आनंदनगर वसाहत, मार्केटयार्ड) व त्याचा भाऊ यश कुंडलिक गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार महिबुब दस्तगीर नदाफ यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस हवालदार नदाफ यांना बातमीदारामार्फत यश गायकवाड व त्याचा भाऊ ओम गायकवाड हे राहत्या घरामध्ये अवैध दारू विक्री तसेच अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनीता नवले, पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंदनगर वसाहतीतील गायकवाड यांच्या घरावर छापा टाकला.

घरात प्रवेश करताच त्यांना टँगो पंच या देशी दारूच्या ३३० बाटल्या आणि मॅकडोवेल नंबर १ व्हिस्कीच्या ७ बाटल्या असा १७ हजार ६३० रुपयांचा माल मिळाला. खोलीच्या वरील बाजूस असलेल्या खोलीची झडती घेतली असता तेथे तलवार, कुर्‍हाड आणि लोखंडी पाईप मिळून आला.

घराची अधिक झडती घेतली असता कपाटात छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या व लहान आकाराचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा मिळाला. घरात अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला. त्याबाबत ओम गायकवाड याच्याकडे विचारणा केली असता, यश गायकवाड याने कोठून तरी आणला असून तो विक्रीसाठी दिलेला आहे, असे त्याने सांगितले.

कपाटातील एका पिशवीत मेफेड्रोन (एमडी) आढळून आला. त्याचे वजन १२५ ग्रॅम भरले. २५ लाख रुपयांचा मेफेड्रोन (एमडी), तसेच देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, तलवार, कुर्‍हाड असा एकूण २५ लाख १८ हजार ८८० रुपयांचा माल ओम गायकवाड याच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर, पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, गोरखनाथ चिनके, राजेश थोरात, महिबुब नदाफ, महेश जेधे, नितेश जाधव, सीमा शेंडकर, हर्षा चांदगुडे, बालाजी शिंदे, संदीप सूर्यवंशी, पूजा कदम, आसावरी धायगुडे यांनी केली आहे.