दोघा गुन्हेगारांकडून ३ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे जप्त
भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : कात्रज डेअरी, चिंतामणी ज्ञानपीठ येथे कारवाया
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून ३ गावठी बनावटीचे कट्टे व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार) आणि शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
पोलीस उपनिरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे २६ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठदरम्यान श्री कोचिंग क्लासेसच्या समोरील गल्लीत ओंकार पवार दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुसे मिळाली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज डेअरी चौक ते सरहद चौकदरम्यान कात्रज डेअरीच्या भिंतीलगत एक जण शस्त्रासह थांबला आहे.
पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन शिरीष खोपडे याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवि जाधव, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लीकार्जुन कोळी, कृष्णा म्हस्के यांनी केली आहे.
