आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुलाने केला आईचा खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 31, 2026
Spread the love

पुणे : विश्रांतवाडीतील शांतीनगर वसाहतीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी मुलाला अटक केली.

सविता सुरेश हरिभक्त (वय ४८, रा. शांतीनगर वसाहत, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा अनिकेत हरिभक्त (वय ३०) याला अटक करण्यात आली. याबाबत सुरेश रामचंद्र हरिभक्त (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता या त्यांचे पती, दोन मुले आणि एक मुलगी यांच्यासह राहत होत्या. अनिकेत याचा विवाह झाला आहे.

त्याची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत राहत नाहीत. अनिकेत काही काम करत नाही. त्याचा भाऊ आणि बहीण काम करतात, तर वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

शनिवारी (२९ ऑगस्ट) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सविता आणि त्यांचा मुलगा अनिकेत यांच्यात वाद झाला. अनिकेत याने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले.

मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने आईच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती ११२ क्रमांकावरून पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील सविता यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी अनिकेत याला ताब्यात घेतले. बराच वेळ तो आईला का मारले, याचे कारण सांगत नव्हता. नंतर त्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईला मारल्याचे सांगितले.

मध्यरात्री अनिकेत याला पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.