आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर अवमानकारक वक्तव्य

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 31, 2026
Spread the love

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या इन्फ्लुएंसरसह दोघांवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संतोष पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया अकाऊंटवरून चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ २७ ऑगस्ट रोजी प्रसारित केला. ‘जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे नेते त्यातीलच एक आहेत,’ असा मजकूर असलेल्या व्हिडिओमध्ये संतोष पंडित याने अवमानकारक भाषा वापरली आहे.

या व्हिडिओमध्ये अश्लील आणि शिवराळ भाषेत सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करून बदनामीकारक व अब्रुनुकसानीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. त्याच्या साथीदाराने व्हिडिओचे चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. नगरसेवक सुनील पांडे यांच्या निदर्शनास नुकताच हा व्हिडिओ आला. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

भारतीय न्याय संहिता कलम ३५६, २९६ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास करत आहेत.

कोण आहे संतोष पंडित?
संतोष पंडित हे पुणेकर असून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जातात. रस्ते आणि महापालिकेच्या कारभारावर टीका करणाऱ्यांमध्ये ते अग्रेसर असतात. ते स्वतःचा उल्लेख ‘नागरिक पत्रकार’ असा करतात. रस्त्यांवरील खड्डे आणि अन्य समस्यांवर ते आपल्या पद्धतीने टीका करतात. काही वेळा ते अतिरेक करत असल्याने त्यातून ते अडचणीतही आले आहेत.
टिळक रोडवरील ग्राहक पेठेसमोर संगीता तिवारी यांच्या ‘गुलाबो गँग’च्या वतीने भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. यावेळी वृत्तांकनासाठी काही पत्रकारही उपस्थित होते. तेथून जात असलेल्या संतोष पंडित यांनी ‘तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडीचा व्हिडिओ बनवला.
तेथे उपस्थित असलेल्या महिला पत्रकार आणि आंदोलनकर्त्या महिलांवर त्यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत टीका करण्यास सुरुवात केली. ‘पत्रकारांमुळे वाहतूक कोंडी होत आहे,’ असे सांगत त्यांनी महिला पत्रकारांच्या कपड्यांवरून शेरेबाजी केली आणि त्यांचे चित्रीकरण सुरू केले. महिला पत्रकारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका महिला पत्रकाराने पर्वती पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.