फ्लॅट विक्रीचा करार करून १४ लाखांची फसवणूक
परस्पर दुसऱ्याला विकला फ्लॅट : कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इमारतीतील शेजारचा फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे समजल्यानंतर घरमालकाशी संपर्क साधून २२ लाख रुपयांमध्ये फ्लॅट खरेदीचा करार केला. त्यापैकी १४ लाख रुपये दिले. उर्वरित ८ लाख रुपये भाडेकरूला देणे बाकी होते. भाडेकरूने एक महिना वेळ मागितला. दरम्यान, घरमालकाने भाडेकरूचे डिपॉझिट परत करून परस्पर दुसऱ्याला फ्लॅट विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
आदिल नजीर सय्यद (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), जाफर थमीउल्ला खान (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि सामी मुस्ताक खान (वय ४५, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हनिफ अब्दुल कादर शेख (रा. के. के. टॉवर, मिठानगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील के. के. टॉवर येथे मे २०२५ पासून आतापर्यंत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या के. के. टॉवरमधील शेजारचा फ्लॅट विक्रीसाठी निघाला असल्याचे त्यांना मित्राकडून समजले. त्यांनी हा फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. त्यांचा मित्र शाहरुख शेख याने आदिल सय्यद यांची भेट घालून दिली. आदिल सय्यद यांनी हा फ्लॅट त्यांच्या नावावर असून, त्यांनी तो सामी खान यांच्याकडून येणे बाकी असलेल्या २४ लाख रुपयांच्या बदल्यात घेतल्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी हा व्यवहार २२ लाख रुपयांमध्ये ठरविला. त्यांनी सामी खान यांना फ्लॅट खरेदी करत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. मात्र, फ्लॅटमध्ये सोहेल इक्बाल शेख हे भाडेकरू राहत असून, त्यांनी ८ लाख रुपये डिपॉझिट दिले असल्याने ते पैसे त्यांना द्यावे लागतील, असे सामी खान यांनी सांगितले. उर्वरित १४ लाख रुपये फिर्यादी यांनी आदिल सय्यद आणि जाफर खान यांना देण्याचे ठरले.
त्यानुसार, २१ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी यांनी आदिल सय्यद आणि जाफर खान यांना १४ लाख रुपये दिले. त्याच दिवशी कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले. तसेच के. के. टॉवरमधील फ्लॅट खरेदीचा लेखी करारनामा करण्यात आला.
त्यानंतर फिर्यादी यांनी फ्लॅटमध्ये राहणारे सोहेल शेख यांना करारनाम्यानुसार त्यांचे ८ लाख रुपये देऊ केले. मात्र, दुसरा फ्लॅट पाहण्यासाठी एक महिना वेळ लागेल, असे सोहेल शेख यांनी सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांना वेळ दिला. एक महिन्यानंतर सोहेल शेख यांचे राहिलेले ८ लाख रुपये घेऊन घराचा ताबा देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी ८ लाख रुपये घेतले नाहीत आणि घराचा ताबाही दिला नाही.
मे २०२५ मध्ये फ्लॅटचे मूळ मालक सामी खान यांनी हनिफ शेख यांची दिशाभूल करून सोहेल शेख यांना त्यांच्याकडून घेतलेले ८ लाख रुपये परत केले आणि फ्लॅटचा ताबा स्वतःकडे घेतला. हा प्रकार समजल्यानंतर फिर्यादी यांनी आपले १४ लाख रुपये परत करण्याची विनंती केली. मात्र, आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन फ्लॅटचा ताबाही दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत. अखेर फिर्यादी यांनी पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.
