आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मेफेड्रोन विक्री करणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 31, 2026
Spread the love

पुणे : मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाना पेठ परिसरात पकडले. त्यामध्ये एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी आणि मोबाईल असा ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नासीर रसूल शेख (वय २२, रा. मोहम्मदवाडी, सय्यदनगर, हडपसर), फराज नजीर शेख (वय २४, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि जावेद हसन शेख (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींसोबत असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक शनिवारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नाना पेठेतील एडी कॅम्प चौकात सात जण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चौघांना पकडले. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम मेफेड्रोन, तीन दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त हसन गौहर आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक फौजदार विठ्ठल साळुंके, आशा भिंगारे, पोलीस अंमलदार अमोल सरडे, अक्षय शिर्के, क्षीरसागर, साळुंखे, राजे आणि गुंड यांनी केली.

शिवाजीनगरमध्ये एका तस्करावर कारवाई
शिवाजीनगर भागातील संचेती चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २७ हजार रुपयांचे ९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
आसिफ अब्दुल शेख (वय २६, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दुचाकीवरून शेख हा मेफेड्रोन विक्रीसाठी संचेती चौकात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार तुषार साळुंखे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
त्याच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी आणि मोबाईल असा १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.