जादा परताव्याचे आमिष दाखवून दोघांची फसवणूक
मानसी इलेक्ट्रीकल अॅन्ड प्रोजेक्टस फर्मचे संचालक : बंडगार्डन पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : मानसी इलेक्ट्रीकल अँड प्रोजेक्ट्स एलएलपी फर्ममध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिलेसह दोघांची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नितीन कुलकर्णी (वय ५१, रा. डहाणुकर कॉलनी), शिरीष देशपांडे (वय ५७, रा. श्रेयनगर, संभाजीनगर), गोकुळ थोरात (वय ५२, रा. संभाजीनगर), अक्षय गर्ग (वय ३५, रा. धानोरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ एप्रिल २०२३ ते २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडगार्डन रोडवर राहतात. मानसी इलेक्ट्रीकल अँड प्रोजेक्ट्स ही भागीदारी संस्था असून, नितीन कुलकर्णी, शिरीष देशपांडे आणि गोकुळ थोरात हे तिघे भागीदार आहेत.
या संस्थेची स्थापना नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात आली आहे. आरोपींनी फिर्यादी यांना मानसी इलेक्ट्रीकल अँड प्रोजेक्ट्स एलएलपी या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले.
त्यानुसार त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये फर्ममध्ये १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना काही महिने परतावा देण्यात आला. हे पाहून त्यांच्या मित्रांनीही या फर्ममध्ये १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
त्यानंतर त्यांना आतापर्यंत कोणताही परतावा देण्यात आला नाही. ही फर्म छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्यांनी आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौगुले तपास करीत आहेत.
