आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन कारवायांमध्ये ८ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा, एमडी जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 1, 2026
Spread the love

पुणे : कोंढवा पोलिसांनी लॉज आणि अजमेरा पार्क अशा दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा आणि मॅफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथक ३१ ऑगस्ट रोजी गस्त घालत होते. त्यावेळी अजमेरा पार्क येथे एक जण दुचाकीवर संशयास्पदरीत्या थांबलेला आढळून आला. पोलिसांनी अमीर अकबर शेख (वय ३६, रा. एल. के. अपार्टमेंट, अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द) याची झडती घेतली. त्याच्याकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा १४९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा मिळून आला. पोलिसांनी ३ हजार ३०० रुपये रोख, २५ हजार रुपयांची दुचाकी आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, असा एकूण ५ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले आणि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र डोके, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, पोलीस हवालदार अमोल हिरवे, कारखेले, रवींद्र चिप्पा, पोलीस अंमलदार केशव हिरवे, अमित सूर्यवंशी, रशिद शेख, राहुल रासगे, रियाज पटेल, पुष्पेंद्र चव्हाण, प्रशांत खाडे, शाहिद रजपुत, ओंकार शेटे आणि रवी जाधव यांनी केली.

लॉजवरून मॅफेड्रोन केले हस्तगत

पोलीस अंमलदार केशव हिरवे यांना २८ ऑगस्ट रोजी माहिती मिळाली की, एक जण पॅराडाईज इन लॉजमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पॅराडाईज इन लॉजवर छापा टाकला. तेथे अजीम सलीम शेख (वय ३७, रा. आयाबेसिफ मस्जिदजवळ, काशेवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची पत्नी आणि मुलगा दुसऱ्या खोलीत राहत होते. आपण उपचारासाठी येथे आलो असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचे १२ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी), ५ हजार ५०० रुपये रोख, दोन मोबाईल आणि १५ इंजेक्शन सिरीज, असा एकूण २ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोघांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे.