कार एक्सचेंज ऑफर शेतकऱ्याला पडली महागात
शोरुमच्या सेल्समनने परस्पर दुसऱ्याला विकली कार : पत्र दिल्यानंतरही ‘आरटीओ’ने केली ट्रान्सफर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एक्सचेंज ऑफरमध्ये कार घेण्याचा प्रयत्न एका शेतकऱ्याला चांगलाच महागात पडला. विमाननगर येथील कारच्या शोरुममधील सेल्समनने स्वतःच्या शोरुमऐवजी कार परस्पर श्रीनाथ मोटर्स यांना विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या शेतकऱ्याने आपली कार कोणालाही ट्रान्सफर करू नये, असे पत्र दिले असतानाही आरटीओने ही कार ट्रान्सफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत नवनाथ विनायक पवळे (वय ४१, रा. वढू, ता. हवेली) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मारुती सुझुकी कार शोरुमचा सेल्समन अक्षय सुदाम काटोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ जून ते १ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेतकरी असून त्यांच्याकडे जुनी सेलेरिओ कार होती. विमाननगर येथील मारुती सुझुकीच्या कोठारी ऑटो व्हिल्स या शोरुममध्ये ते १८ एप्रिल २०२५ रोजी गेले. त्यांना सेलेरिओ कार आवडली. त्यांनी कार एक्सचेंज करायची असल्याचे सांगितल्यानंतर हे काम शोरुममधील सेल्समन अक्षय सुदाम काटोरे पाहतो, असे सांगण्यात आले. अक्षय काटोरे याला त्यांनी आपली कार दाखविली. या कारची रिसेल व्हॅल्यू ३ लाख ८५ हजार रुपये होईल, असे त्याने सांगितले.
त्यांनी नवीन कार खरेदीसाठी शोरुममध्ये ५० हजार रुपये भरले. दोन दिवसांनी कार घेण्यासाठी घरी येतो, असे अक्षय याने सांगितले. त्यानंतर तो गाडी घेऊन गेला. दोन दिवसांनी त्याने गाडीच्या टीटी फॉर्मवर सह्या घेतल्या. तुमच्या गाडीचे पैसे शोरुममध्ये जमा होतील. त्यानंतर तुम्हाला नवीन गाडीची डिलिव्हरी मिळेल, असे त्याने सांगितले.
दरम्यान, त्यांच्या पुतणीचे निधन झाल्याने त्यांनी नवीन गाडी घेण्याचे थांबवले होते. अक्षय काटोरे याच्याशी संपर्क केल्यावर त्याने तुमचे पैसे आरटीजीएसद्वारे मिळतील, असे सांगितले. त्यानंतर १४ जून २०२५ रोजी अक्षयने फोन-पेवरून ५० हजार रुपये पाठविले. बाकीच्या पैशांबाबत अक्षयला फोन केल्यावर तो, ‘मी गावी आलो आहे, मुलगी आजारी आहे,’ असे कारण देत होता. गाडी विक्रीचे ३ लाख ३५ हजार रुपये देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता.
शेवटी फिर्यादी शोरुममध्ये गेले. तेव्हा अक्षय याने त्यांची कार शोरुममध्ये जमा न करता परस्पर दुसऱ्याला विकल्याचे समजले. त्यांनी चौकशी केल्यावर ती कार मलठण फाटा येथील श्रीनाथ मोटर्सला विकल्याचे समजले. श्रीनाथ मोटर्सकडून अक्षय याने पैसे घेतले असले, तरी तो त्यांना ते पैसे देत नव्हता.
त्यानंतर त्यांनी १ जुलै २०२५ रोजी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांना आपली सेलेरिओ गाडी कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ नये, यासाठी पत्र दिले होते. तरीही त्यानंतर एक महिन्याने त्यांची गाडी सचिन ढोकले (रा. वाघोली) यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचे त्यांना समजले.
अक्षय काटोरे याने फिर्यादी यांचे पूर्ण पैसे न देता, परस्पर श्रीनाथ मोटर्सचे मालक तेजस गायकवाड यांच्या मार्फत सचिन ढोकले यांना कार विकली. या गाडीवर कर्ज काढून दिलेले आहे. सध्या त्याने शोरुममध्ये येणे बंद केले आहे.
शेवटी फिर्यादी यांनी अक्षय काटोरे याने त्याची पत्नी शिवानी काटोरे तसेच तेजस गायकवाड व सचिन ढोकले यांच्याशी संगनमत करून फसवणूक केल्याची फिर्याद विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करीत आहेत.