आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बेकायदा सावकारी करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 1, 2026
Spread the love

पुणे : १० ते २० टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर कर्जाची रक्कम फेडूनही आणखी पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बेकायदा सावकारी करणार्‍या दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुरुदीपसिंग ऊर्फ राजू जगतसिंग मखीजा (वय ६३, रा. गुरुवार पेठ) आणि तरविंदरसिंग गुरुनामसिंग व्होरा (वय ५८, रा. उंड्री, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २०२० ते ७ मे २०२६ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बेकरी व्यावसायिक आहेत. पायावर औषधोपचार करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी तरविंदरसिंग व्होरा याच्याकडून पाच टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी दोन लाख रुपये घेतले. गणेश पेठेतील कार्यालयात व्होरा याने दोन लाख रुपयांपैकी १० हजार रुपये व्याज म्हणून कापून फिर्यादीला एक लाख ९० हजार रुपये दिले. तसेच त्यावेळी दोन धनादेशांवर स्वाक्षरी करून घेतली.

फिर्यादी यांनी २०२२ पर्यंत नियमितपणे व्याजाची रक्कम दिली आणि दोन लाख रुपयांची परतफेड केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा पाच लाख रुपये घेतले. या रकमेचीही २०२४ मध्ये परतफेड केली.

दरम्यान, मे २०२३ मध्ये फिर्यादी यांनी गुरुदीपसिंग मखीजा याच्याकडून १० टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले. मखीजा याने त्यातून पाच हजार रुपये व्याज म्हणून कापून ४५ हजार रुपये दिले. २०२४ मध्ये फिर्यादी यांनी त्याची ५० हजार रुपयांची परतफेड केली. त्यानंतर मखीजाने २० टक्के व्याजाने पुन्हा ५० हजार रुपये दिले. तसेच ‘१३ दिवसांचा महिना असेल,’ अशा शब्दांत दमदाटी केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

मखीजा हा दारूच्या नशेत फिर्यादीच्या दुकानात येऊन विनाकारण आरडाओरड करीत दहशत निर्माण करायचा. तसेच जीवे मारण्याची धमकी देत असल्याने फिर्यादीच्या व्यवसायावरही परिणाम होऊ लागला.

या दोघांनी मानसिक त्रास देऊन फिर्यादीचे आर्थिक, सामाजिक व शारीरिक नुकसान केले. तसेच त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली. सुरक्षेसाठी घेतलेल्या कोऱ्या धनादेशाचा गैरवापर करून ९ लाख ८० हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा करण्यात आला. तो धनादेश वटला नसल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

याच पद्धतीने या दोघांनी आणखी तिघांना भरमसाट व्याजाने पैसे दिले. त्यांच्याकडून कर्जाची रक्कम वसूल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या चौघांकडून एकूण ३१ लाख ३३ हजार रुपये वसूल केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

खोटे कागदपत्र तयार करून धनादेश बँकेत जमा करणे, धनादेश वटला नसल्याचे सांगून वकिलामार्फत नोटीस पाठविणे आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लोणकर करीत आहेत.