पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून ७ पिस्तुले चोरीला
कचरावेचकाने धमकाविल्याने आला प्रकार उघडकीस : बंडगार्डन पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बंडगार्डन पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एका कचरावेचकाने तब्बल सात पिस्तुले चोरली होती. परंतु, याचा पोलिसांना पत्ताच लागला नाही. या चोरट्याने यातील एका पिस्तुलाने रात्री एकाला धमकाविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटे ती सात पिस्तुले पोलिसांना मिळाली.
राकेशकुमार संजयकुमार चिटेकर (रा. फिरस्ता, मूळ रा. कलबुर्गी, कर्नाटक) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी बारा वाजताच्या सुमारास सेंट्रल बिल्डिंगसमोरील मुद्देमाल कक्षात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलिसांचा सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीच्या एका खोलीत मुद्देमाल कक्ष आहे. आरोपी राकेशकुमार हा मूळचा कर्नाटकातील कलबुर्गीचा रहिवासी आहे. पुण्यात तो फिरस्ता असून, त्याला दारूचे व्यसन आहे. शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तो कचरा गोळा करत-करत मुद्देमाल कक्षाच्या खोलीपर्यंत पोहोचला. त्यानंतर पाठीमागील दरवाजा उचकटून तो आत गेला. तेथे त्याने सुरुवातीला काही बिअरच्या बाटल्या चोरी केल्या. बिअर प्यायल्यानंतर त्याने तेथील सात पिस्तुले चोरली. ही पिस्तुले सोबत घेऊन तो दिवसभर फिरत होता.
राकेशकुमार रात्री साडेदहा वाजता साधू वासवानी चौकातून बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. त्याने एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखविला. त्या व्यक्तीने ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तातडीने राकेशकुमारला पकडून पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्याने ते पिस्तूल सेंट्रल बिल्डिंगसमोरील इमारतीतून चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलीस ठाण्यात हे पिस्तूल पाहत असताना एका पोलिसाला त्यावर लिहिलेले ‘बीएल’ हे अक्षर दिसून आले. हे पिस्तूल कोणत्यातरी गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेले होते, हे पोलिसांच्या लक्षात आले. हे समजताच बंडगार्डन पोलीस खडबडून जागे झाले. त्यांनी राकेशकुमारकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने आणखी काही पिस्तुले आपल्याकडे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याची पिशवी त्याच ठिकाणी पडली होती. त्या पिशवीत सहा पिस्तुले होती. पोलिस जेव्हा ती पिशवी शोधण्यासाठी गेले, त्यावेळी ती मिळून आली नाही. ती पिशवी दुसऱ्या एका फिरस्त्याने उचलून नेली होती. सहा पिस्तुलांचा शोध बंडगार्डन पोलीस रात्रभर घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता, एक व्यक्ती ती पिशवी उचलून नेताना दिसली. त्याचा माग काढत पोलिसांनी जनरल पोस्ट ऑफिसचा परिसर गाठला. तेथे एका झाडात ती पिशवी पोलिसांना मिळून आली. पिशवी उघडून पाहताच त्यामध्ये सहा पिस्तुले मिळून आली.
दरम्यान, पोलिसांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून राकेशकुमार चिटेकर याला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेने केली होती पिस्तुले जप्त
बंडगार्डन पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून चोरीला गेलेली ही पिस्तुले गुन्हे शाखेने एका कारवाईमध्ये २०२२ मध्ये जप्त केली होती. बंडगार्डन पोलिसांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जप्त केलेली पिस्तुले बंडगार्डन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती.
सुदैवाने ही पिस्तुले फिरस्त्याच्या हाती लागली. जर एखाद्या गुन्हेगाराच्या हाती ही पिस्तुले लागली असती, तर त्याचा परिणाम शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर झाला असता.
