आंबेगाव पठारामध्ये गोळीबारात तरुण जखमी
भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला केली अटक : पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना त्याच्या हातातून अचानक चाप दाबला गेला. त्यामुळे गोळी सुटून ती तरुणाच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार पळून गेला. त्याच्या साथीदाराने जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भारती विद्यापीठ पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी साथीदाराला अटक केली आहे.
अविनाश दादासो मोरे (वय १९, रा. दत्तनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सनी ऊर्फ संदीप सुभाष दीपक (वय ३०, रा. फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सनी दीपक याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संकेत गोरक्ष चोरघे (रा. कोलवडी, ता. वेल्हा) याच्यासह सनी दीपक व अविनाश मोरे यांच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव पठार येथील साई सिद्धी चौक येथे १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत चोरघे हा गुन्हेगार असून ग्रामीण पोलिसांनी त्याला २०२४ मध्ये अटक करून त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले होते.
खंडणीविरोधी पथकाने फेब्रुवारी २०२६ मध्ये आर्म अॅक्टखाली त्याला अटक केली होती. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त केली होती.
आंबेगाव पठार येथील साई सिद्धी चौकात संकेत चोरघे, सनी दीपक आणि अविनाश मोरे हे १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री गप्पा मारत थांबले होते.
यावेळी संकेत चोरघे याने त्याच्याकडील पिस्तूल दाखविले. अविनाश मोरे याने हे पिस्तूल घेऊन पाहिले. त्यानंतर सनी याने हे पिस्तूल घेऊन पाहत असताना अचानक चाप ओढला.
त्याबरोबर त्यातून गोळी सुटून ती त्याच्या मांडीत शिरली. हे पाहून संकेत चोरघे हा पळून गेला. अविनाश मोरे याने जखमी सनी याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले.
हॉस्पिटलमधून भारती विद्यापीठ पोलिसांना गोळीबारात तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी सनी दीपक याच्याकडे चौकशी केली. त्यातून गोळीबाराचा हा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.
