गर्दीत महिलांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड
मध्य प्रदेशातील ६ महिला अटकेत : लक्ष्मीनगर पोलिसांची कामगिरी, ७ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खरेदीसाठी झालेल्या गर्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील रोकड लांबविणाऱ्या मध्य प्रदेशातील महिलांच्या टोळीला लक्ष्मीनगर पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणी सहा महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, १० मोबाइल असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, तसेच विश्रांतवाडी पोलीस ठाणे आणि लष्कर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
निशा शंतून सिसोदिया (वय ३०, सध्या रा. आळंदी देवाची, ता. खेड, मूळ रा. राजगड, भोपाळ, मध्य प्रदेश), प्रिया असिक सिसोदिया (वय ३४), पूनम प्रदीप सिसोदिया (वय २७), वर्षा कमल सिसोदिया (वय ३५), आसना रघुवीर सिसोदिया (वय ३२), सोनिका निरोत्तम सिसोदिया (वय ३७) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्या महिला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील काडिया, गुलखेडी परिसरातील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील रोकड चोरून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या.
येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. पोलिसांनी लक्ष्मीनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील १५० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.
२७ ऑगस्ट रोजी आरोपी महिला संगमवाडी येथील प्रवासी वाहतूक करणाऱ्या थांब्याजवळ आल्या होत्या. त्या मध्य प्रदेशात पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत महिला पोलीस सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी महिलांकडून सोन्याचे दागिने, रोकड, १० मोबाइल असा माल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलूमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार, दत्तात्रय लिगाडे, पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे, गणेश लोखंडे, सूरज ओंबासे, किरण भागीत, अतुल जाधव, धनश्री कांबळे, वर्षा तळेकर यांनी केली.
अशी होती चोरीची मोडस – मध्य प्रदेशातील महिलांनी खरेदीच्या गर्दीत महिलांकडील दागिने, रोकड लांबविली. गर्दीत धक्का देऊन त्या दागिने काढून घेत. ऐवज चोरल्यानंतर त्याचा संशय येऊ नये म्हणून वेगवेगळ्या रस्त्याने पसार व्हायच्या. मध्य प्रदेशातील या महिला सध्या आळंदी देवाची येथे राहत होत्या. त्या पिंपरी-चिंचवड परिसरातून येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत समोर आले आहे. या टोळीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आणखी काही गुन्हे केले असून, त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
