तहसीलदारांच्या आदेशासाठी लाच घेणारा जाळ्यात
सासवड तहसील कार्यालयात सापळा : क्लार्क म्हणविणारा निघाला दलाल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणात तहसीलदारांचा आदेश मिळवून देण्यासाठी एकाकडून २५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी विजय मल्हारी खळदकर (वय ५७, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. खळदकर हा स्वतःला क्लार्क असल्याचे सांगत होता. प्रत्यक्षात तो सरकारी कर्मचारी नसून खासगी व्यक्ती असल्याचे कारवाईनंतर उघड झाले.
याबाबत एका ३७ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वडिलोपार्जित जमीन पुरंदर तालुक्यात आहे.
या जमिनीच्या असमान हिस्स्याची सुनावणी सासवड येथील तहसीलदार कार्यालयात सुरू होती. २४ जून रोजी तहसीलदारांनी वादी आणि प्रतिवादी यांना समान संधी देऊन हे प्रकरण बंद केले. मात्र, याबाबत तहसीलदारांनी आदेश दिले नव्हते.
त्यानंतर तक्रारदार २९ ऑगस्ट रोजी सासवड येथील तहसीलदार कार्यालयात गेले. त्यावेळी खळदकर त्यांना भेटला. हे प्रकरण तहसीलदारांसमोर ठेवण्यासाठी खळदकर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (२ सप्टेंबर) सासवड येथील तहसीलदार कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार तेथे गेले आणि त्यांनी खळदकर याची भेट घेतली.
त्यावेळी या प्रकरणात तहसीलदारांचे आदेश मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर खळदकर याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी सायंकाळी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून खळदकर याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे, हवालदार बाळासाहेब गदादे, दीपक काकडे आणि रवी दिवेकर यांनी केली.
