आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बांधकाम व्यावसायिक अमित गोयल यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 3, 2026
Spread the love

पुणे : व्यवसायासाठी व्याजाने पैसे देण्याचा वैध परवाना नसताना व्याजाने पैसे देऊन, बनावट व्यक्तीला उभे करून कुलमुखत्यारपत्र तयार करून फसवणूक केली. गोयल गंगा या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे अमित गोयल यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय तुकाराम रौंदळ (वय ५८, रा. मॅनहॅटन सोसायटी, पल्लोड फार्म, बाणेर रोड), अभी विजय रौंदळ (वय ३३, रा. तीर्थ टेक्नो स्पेस, बाणेर), देवेंद्र ललितकुमार शहा (रा. गंगा टेरेस, मुंढवा रोड), उमेहानी एम. दाभोईवाला (रा. ग्रीनलान्स, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अमित जयप्रकाश गोयल (वय ४४, रा. सनमाहु कॉम्प्लेक्स, बंडगार्डन रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या कार्यालयात झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे कोणताही व्याजाने पैसे देण्याचा वैध परवाना नाही. असे असताना त्यांनी १२ कोटी ४० लाख रुपये ९ टक्के वार्षिक व्याजाने फिर्यादी यांच्या गोयल गंगा इंडिया या कंपनीला कर्जापोटी दिले होते.

फिर्यादी यांनी कर्जाच्या सुरक्षेपोटी कंपनीच्या मालकीचे ६०८५ चौरस मीटर क्षेत्र सब-रजिस्ट्रार हवेली यांच्या कार्यालयात साठेखत दस्त आरोपींच्या नावाने लिहून दिले होते.

परंतु, कालांतराने विजय रौंदळ याने फिर्यादी यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून दरमहा ४.१६ टक्के, म्हणजे वार्षिक ४९.९२ टक्के दराने ६० कोटी ७८ लाख रुपयांची खंडणीवजा रकमेची बेकायदेशीर मागणी केली.

ही खंडणीवजा रक्कम दिल्यानंतर हे साठेखत रद्द करून देतो, असे त्याने सांगितले होते. तसेच, आरोपीला या कुलमुखत्यारपत्रात इतर कोणासही अधिकार हस्तांतरित करण्याबाबत कोणतेही हक्क व अधिकार दिलेले नव्हते.

असे असताना विजय रौंदळ याच्या नावाने खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधक हवेली यांच्या कार्यालयात देवेंद्र ललितकुमार शहा याला फिर्यादी यांच्या वतीने उभे करून नोंदणी करण्यात आली व फिर्यादी यांची फसवणूक केली.

तसेच, फिर्यादी यांची मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशाने आरोपींनी या मिळकतीचे लेटर ऑफ इंटेन्ट, टर्म शीट तयार करून देवेंद्र शहा याच्याकडून ३ कोटी रुपये विजय रौंदळ याने स्वीकारले.

याविरोधात फिर्यादी यांनी चौघांविरुद्ध न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करीत आहेत.