आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची सव्वा कोटींची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 3, 2026
Spread the love

पुणे : ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून मगरपट्टा सिटी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हडपसरमधील मगरपट्टा सिटीमध्ये राहायला आहेत.

सायबर चोरट्यांनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर २० ऑगस्ट रोजी संपर्क साधला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली.

काळ्या पैशांच्या व्यवहारात त्यांच्या नावाच्या बँक खात्याचा वापर झाला आहे. या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखवली.

अटक टाळण्यासाठी तातडीने बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले.

तक्रारदाराने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यांमध्ये गेल्या दहा दिवसांत एक कोटी २८ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिक तपास सुरू केला आहे. फिर्यादीने ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले, त्याची माहिती घेण्यात येत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.