आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोरेगाव पार्कमधील पबच्या मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 5, 2026
Spread the love

पुणे : परवानगीपेक्षा अधिक काळ म्हणजेच पहाटे ४ वाजेपर्यंत मद्यविक्री करून लाऊडस्पीकर सुरू ठेवत नागरिकांना त्रास देणाऱ्या कोरेगाव पार्कमधील हॉटेल प्लंज आणि त्याच्या मालकांसह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जितेश मेहता, सुनील पवार, विराज, शुभम आचारी, राहुलसिंग, डी.जे. ओंकार आणि डी.जे. श्रेयश अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पबचे जितेश मेहता हे मालक असून, सुनील पवार मॅनेजर आहे. अन्य आरोपी डी.जे. चालक व त्यांचे कर्मचारी आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील ज्वेलर टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर हॉटेल प्लंज हा पब व बार आहे. शासकीय नियमानुसार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास परवानगी आहे.

असे असतानाही हॉटेल प्लंज येथे पहाटे ४ वाजेपर्यंत मद्यविक्री केली जात होती. मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावून नागरिकांना त्रास दिला जात होता.

१ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरू होता. परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली.

त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हॉटेल प्लंज येथे पोहोचले. त्यावेळी तेथे लाऊडस्पीकर सुरू होता. काही जण मद्यपान करत होते.

पोलिसांनी तेथील लाऊडस्पीकर तसेच काउंटरवरील बिलिंग विभागातील साहित्य जप्त केले असून, मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करीत आहेत.