चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संतोष पंडितला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी संतोष पंडित याला अटक करण्यात आली.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या प्रकरणी संतोष पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया खात्यावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ नुकताच प्रसारित केला होता.
‘जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे त्यापैकी एक आहेत’, असा मजकूर असलेल्या व्हिडिओमध्ये अवमानकारक वक्तव्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक पांडे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
या व्हिडिओमध्ये अश्लील व शिवराळ भाषेचा वापर करून अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६, २९६, ३ (५) अन्वये पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंडित याला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.
