१ लाख २० हजारांची लाच घेणाऱ्या लिपिकाला अटक
कर आकारणी कमी करून देण्याचे आश्वासन : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नवीन बांधलेल्या इमारतीचा कर ५० हजार रुपयांच्या आत करू शकतो, असे सांगून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लिपिकाला अटक केली आहे.
उमेश सुब्रव कुटे (वय ३७, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे या लिपिकाचे नाव आहे. तो पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी करसंकलन विभागीय कार्यालयात लिपिक आहे.
तक्रारदार यांनी पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा खरेदी केली. त्यावर तीन मजली इमारत बांधली आहे. या नवीन मालमत्तेची कर आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयात अर्ज केला होता.
त्या अर्जाच्या अनुषंगाने लिपिक उमेश कुटे याने या इमारतीला प्रतिवर्षी ९१ हजार ४७२ रुपये कर होईल, असे सांगितले. तो कमी करून प्रतिवर्षी ५० हजार रुपयांच्या आत कर करू शकतो, असे सांगून तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. या तक्रारीची ३ सप्टेंबर रोजी पडताळणी केली. त्यात उमेश कुटे याने तडजोडीअंती १ लाख २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सांगवीतील आनंदनगर येथील स्विमिंग टँक रोडवर १ लाख २० हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारताना उमेश कुटे याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व पोलीस अंमलदार कैलास महामूलकर, अश्विन कुमकर, सहायक फौजदार अविनाश चव्हाण यांनी केली आहे.
