आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डीजे वाजवणाऱ्या मंडळाला दणका

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 4, 2026
Spread the love

पुणे : ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत साऊंड सिस्टिमचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण केल्याच्या खटल्यामध्ये न्यायालयाने मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साऊंड सिस्टिमचे मालक यांना शिक्षा सुनावली आहे. खडक पोलिसांनी २४ तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल केल्याने हा खटला तात्काळ निकाली काढण्यात आला.

अल मदिना यंग बॉईज मंडळाचे अध्यक्ष वाहिद कासम मणियार व उपाध्यक्ष जायेद मजीद शेख (रा. लोहियानगर), डीजे साऊंड सिस्टिम ऑपरेटर व मालक प्रकाश कृष्णात अस्वले (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

२६ ऑगस्ट रोजी लोहियानगर कमानीजवळ सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास होईल, अशा प्रकारे गर्दी जमवून साऊंड सिस्टिमचा आवाज सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या डेसिबलपेक्षा जास्त ठेवून वाजवला जात असल्याचे आढळून आले.

अनेक वेळा सांगून व नोटीस देऊनही त्यांनी साऊंड सिस्टिमचा आवाज कमी न केल्याने खडक पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली.

शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात २४ तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार न्यायालयाने अल मदिना यंग बॉईज मंडळाचे अध्यक्ष वाहिद कासम मणियार, उपाध्यक्ष जायेद मजीद शेख, डीजे साऊंड सिस्टिमचे ऑपरेटर व मालक प्रकाश कृष्णात अस्वले यांना शिक्षा सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वळसंग, स्वप्नील बनकर, पोलीस हवालदार राजाराम गाढवे, पोलीस अंमलदार भूषण चव्हाण, कल्याण घोरपडे यांनी केली आहे.