आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 5, 2026
Spread the love

पुणे : लाऊडस्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप इतकीच परवानगी असताना त्याच्या दुप्पट साऊंड सिस्टिम लावणाऱ्या बिबवेवाडी येथील मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या मंडळाची साऊंड सिस्टिम जप्त केली आहे.

राहुल प्रकाश जगताप (रा. बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी) असे श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. या वर्षी दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ आहे.

याबाबत पोलीस अंमलदार प्रतीक दिलीप करंजे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वांना इशारा देण्यात आला होता की, लाऊडस्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप यांना परवानगी देण्यात येणार आहे.

त्यापेक्षा अधिक लाऊडस्पीकर लावून ध्वनिप्रदूषण केल्यास कारवाई करण्यात येईल, तसेच साऊंड सिस्टिम जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. असे असतानाही दुप्पट साऊंड सिस्टिम वापरण्यात आली होती.

बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याकडून पारंपरिक वाद्य वापरण्याचा परवाना घेतला होता.

त्यात लाऊडस्पीकर वापरण्याबाबतच्या लेखी आदेशाचा भंग करून ८ बेस व ८ टॉप असे लाऊडस्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला आहे.

त्यामुळे मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गरड तपास करीत आहेत.