आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फसवणूक करणारी ‘प्रिन्सिका जोशी’ ‘ती’ नव्हे ‘तो’ निघाला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 5, 2026
Spread the love

पुणे : स्नॅपचॅटवर प्रिन्सिका जोशी बनून तिने मैत्री केली. त्यातून त्याला क्रिप्टोमध्ये चांगला फायदा मिळतो, असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या फसवणुकीचा माग काढताना सायबर पोलिसांनी त्या प्रिन्सिका जोशीचा पर्दाफाश केला आहे. ‘ती’ तरुणी नसून ‘तो’ असल्याचे समोर आले आहे.

कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर) असे त्याचे नाव आहे. कुणाल अदमाने हा तब्बल ६ ते ७ महिने स्नॅपचॅटवर चॅटिंग तसेच मोबाईल फोनवरून नियमित संवाद साधत होता.

तक्रारदार यांच्या स्नॅपचॅट खात्यावर प्रिन्सिका जोशी नावाच्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तक्रारदार व या स्नॅपचॅट वापरकर्त्यामध्ये मैत्री निर्माण झाली. त्यानंतर ते तब्बल ६ ते ७ महिने स्नॅपचॅटवर चॅटिंग तसेच मोबाईल फोनवरून नियमित संवाद साधत होते. मैत्रीचा विश्वास संपादन केल्यानंतर या ‘प्रिन्सिका जोशी’ हिने तक्रारदारांना क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा व आकर्षक परतावा मिळतो, असे सांगितले.

त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी वेळोवेळी त्यांच्या क्रिप्टो वॉलेटमधून तिच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये १४६८ यूएसडीटी, अंदाजे दीड लाख रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर केली. काही कालावधीनंतर तक्रारदारांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेली वाढ, गुंतवणुकीचा परतावा व पैसे परत मिळण्याबाबत वारंवार विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘प्रिन्सिका जोशी’ या नावाने संपर्क साधणाऱ्या तरुणीने आपले स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले. तसेच संपर्क टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या क्रिप्टोकरन्सी फसवणूक गुन्ह्याची पद्धत अत्यंत वेगळी असल्याने सायबर पोलिसांनी उपलब्ध स्नॅपचॅट आयडी, मोबाईल क्रमांक तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. त्यात कुणाल अदमाने हा मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. तक्रारदाराने फसवणूक करणारी ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची मुलगी असल्याचे नमूद केले होते. मात्र, येथे पुरुष आरोपी असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी कुणाल अदमाने याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. तेव्हा ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची तरुणी प्रत्यक्षात नव्हती. तोच ‘प्रिन्सिका जोशी’ बनून तक्रारदाराशी मुलीच्या आवाजात संभाषण करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा उच्चशिक्षित असून त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेले आहे. कुणाल अदमाने याला अटक केली आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलीची बनावट ओळख निर्माण करून आणखी किती व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले आहे, याची चौकशी करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे व पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस अंमलदार कृष्णकांत देसाई, बाळासो चव्हाण, जान्हवी बढेकर, रवींद्र साळवे, संदीप मुंढे, संदीप कारकुड, सुप्रिया होळकर, कृष्णा मारकड, श्रीकृष्ण नागटिळक, सोनाली चव्हाण यांनी केली आहे.

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी. फोटो, नाव किंवा आवाज यावरून समोरील व्यक्तीची खरी ओळख निश्चित होतेच असे नाही. बनावट सोशल मीडिया प्रोफाइलच्या माध्यमातून मैत्री करून, त्यानंतर भावनिक किंवा आर्थिक विश्वास संपादन करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून कमी कालावधीत मोठा व निश्चित परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये. स्नॅपचॅट किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया माध्यमातून मैत्री करून क्रिप्टोकरन्सी अथवा अन्य प्रकारे पैसे गुंतविण्यास भाग पाडले असल्यास, तसेच अशा प्रकारची आर्थिक फसवणूक झालेली असल्यास, नागरिकांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व उपलब्ध चॅट, मोबाईल क्रमांक, सोशल मीडिया आयडी, क्रिप्टो वॉलेट ॲड्रेस व व्यवहाराची माहिती सुरक्षित ठेवावी. नागरिकांनी सोशल मीडियावरील ‘खोटी ओळख’ आणि क्रिप्टोकरन्सीमधील ‘जलद व मोठ्या परताव्याच्या’ आमिषाला बळी पडू नये. तसेच, कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.