आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएमपीचा बनावट पास तयार करून फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 5, 2026
Spread the love

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएल) बनावट प्रवासी पास तयार करून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रथमेश लक्ष्मण बोगे (वय २०, रा. रेड क्लिफ शाळेजवळ, चऱ्होली, आळंदी रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पीएमपीचे सहायक आगार व्यवस्थापक रामदास विरनक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीएमपी प्रवासाचा बनावट पास, तसेच अ‍ॅप तयार केले होते. या पासचा वापर करून तो प्रवास करत होता.

३० ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तो पीएमपी बसने प्रवास करत होता. बंडगार्डन रस्त्यावरील रुबी हॉल थांब्याजवळ तो बसमधून उतरला. तिकीट तपासनीसांनी त्याच्याकडे तिकिटाची मागणी केली. तेव्हा त्याने तिकीट तपासनीसांना प्रवासी पास दाखविला. पास, तसेच त्याच्याकडील अ‍ॅपची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याने बनावट पास आणि अ‍ॅप तयार केल्याचे उघडकीस आले.

बनावट अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून बनावट पासने प्रवास करून पीएमपी महामंडळाची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस तपास करीत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेच्या स्कूल बॅगेतून दागिने चोरी
पीएमपी प्रवासी महिलेच्या पाठीवरील स्कूल बॅगेतून ९५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा परिसरात राहतात. त्या ३ सप्टेंबर रोजी घोटावडे फाटा ते कोथरूड या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. बस प्रवासात चोरट्यांनी त्यांच्या पाठीवरील स्कूल बॅगेतून ९५ हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि रोकड चोरून नेली.
पौड रस्त्यावरील लोहिया जैन आयटी पार्कजवळील थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा बॅगेतील दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक घावटे तपास करीत आहेत.