आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

श्री वर्धमान स्वामी भगवान प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 5, 2026
Spread the love

पुणे : कोंढवा परिसरातील थ्री ज्युवेल्स सोसायटी येथे श्री वर्धमान स्वामी भगवान यांच्या प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. श्री वर्धमान स्वामी जैन संघ (श्री ज्युवेल्स), पुणे यांच्या वतीने या प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जयराज ग्रुपच्या मातोश्री कंचनबेन हिरालालजी शहा (चोखावाला) परिवारातील राजेश शाह व जयंत शाह यांचे महोत्सवासाठी बहुमूल्य योगदान लाभले.

भक्तियोगाचार्य प. पू. आ.भ. श्री यशोविजयसूरीश्वरजी म. सा., शासनसरोज प. पू. आ. भ. श्री सुविजयसूरीश्वरजी म. सा., तत्त्वकुशलाचार्य प. पू. आ.भ. श्री राजपुण्यसूरीश्वरजी म. सा. आणि वैभवसुधांशु प. पू. आ.भ. श्री कल्याणविजयसूरीश्वरजी म. सा. आदी संतांच्या मंगल सान्निध्यात प्रतिष्ठा महोत्सवातील धार्मिक विधी पार पडले.

महोत्सवातील मुख्य सोहळ्यात श्री वर्धमान स्वामी भगवान यांच्या मूर्तीची मुख्य गाभाऱ्यात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच श्री पार्श्वनाथ प्रभू भगवान, श्री आदिनाथ भगवान, श्री गौतम स्वामी भगवान, श्री सुधर्मा स्वामी भगवान, श्री मणिभद्र वीर भगवान आणि श्री पद्मावती माता यांच्या मूर्तींचीही विधिवत प्रतिष्ठा करण्यात आली.

प्रतिष्ठा महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना २६ ऑगस्टपासून सुरुवात झाली. ३ सप्टेंबर रोजी प्रभुजी की मेहंदी एवं सांझी, तर ४ सप्टेंबर रोजी माणकस्तंभ, घंटाकर्ण महावीर स्थापना, वेदिका स्थापना, लघु नंदीवर्त पाटला पूजन, नवग्रह पाटला पूजन, दशदिक्पाल पाटला पूजन आणि अष्टमंगल पाटला पूजन आदी धार्मिक विधी संपन्न झाले.

५ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता प्रभूंचा मंगल प्रवेश झाला. त्यानंतर शुभमुहूर्तावर मंगल प्रतिष्ठेचा मुख्य सोहळा आणि फले चुंदडी (गौतम प्रसाद) यांचे आयोजन करण्यात आले.

याच दिवशी दुपारी बृहत शांतिस्नात्र पूजनही भक्तिभावाने संपन्न झाले. या प्रतिष्ठा महोत्सवाला पुणे तसेच परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

असंख्य भाविकांनी श्री वर्धमान स्वामी भगवान यांचे दर्शन घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. संपूर्ण महोत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश शाह, जयंत शाह, धवल शाह, मालव शाह, हंसा शाह, हिना शाह, सेजल शाह आणि प्राची शाह यांच्यासह शहा परिवारातील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महोत्सोवाच आयोजन जयराज ग्रुपच्या वतीने करण्यात आले.