आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट कागदपत्रे करून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 5, 2026
Spread the love

पुणे : आडनावात साम्य असल्याचा गैरफायदा घेऊन पुतण्या असल्याचे भासवून महिलेच्या पत्त्यावर बनावट सातव लँडमार्क कंपनीची स्थापना केल्याचे दर्शवले. त्याद्वारे भारती एअरटेल कंपनीला ऑप्टिक फायबर केबल टाकण्यास परवानगी दिली. त्यांच्याकडून १७ लाख रुपये घेतले. त्यांनी तयार केलेल्या सिमेंट रस्त्यातील पाईपमधून केबल टाकून मालमत्तेचे नुकसान करून त्यांचे ४२ लाखांचे आर्थिक नुकसान केले. सातव लँडमार्कचे अजित सातवसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निर्मलादेवी प्रतापराव सातव (वय ८१, रा. चंद्रीमा, सहजीवननगर, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सातव लँडमार्कतर्फे प्रा. अजित सुरेश सातव (रा. वाघोली), संतोष निवृत्ती तांबे (वय ३५, रा. बाईफ रोड, वाघोली), सागर जाधव (वय ३६, रा. संत तुकारामनगर, वाघोली), विकास पोखरणा (वय ३८, रा. नॉर्थ टॉवर, ई पार्क, खराडी), भारती एअरटेल (रा. खराडी) व एअरटेल सेंटर, गुडगाव, हरियाना) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार वाघोली येथे ऑक्टोबर २०१८ ते ४ सप्टेंबर २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वाघोली येथे गट क्रमांक ५६९ व ५७० ही मिळकत मालकी हक्काची आहे. या मिळकतीवर त्यांनी २०१५ मध्ये टोपाज होम्स एलएलपी आणि मॅजेस्टिक बिल्डर या दोन विकसकांना विकसनासाठी दिली आहे. या मिळकतीच्या विकसनासाठी त्यांनी स्वतः भावडी रोड व अहिल्यानगर महामार्गापर्यंत सिमेंटचा रस्ता करून घेतला असून, तो आजपर्यंत त्यांच्या मालकीचा आहे.

२०१८ मध्ये या मिळकतीच्या जागेवर दोन वेगवेगळे बिल्डर एकाच जागेवर आजूबाजूला मोठे कन्स्ट्रक्शन करत असताना तेथील वर्दळीचा गैरफायदा घेऊन दोन्ही बिल्डर यांच्यामध्ये एकमेकांविषयी अजित सुरेश सातव, संतोष तांबे, सागर जाधव यांनी संभ्रम निर्माण केला. या मिळकतीच्या मालकाबद्दल विचारणा करण्यासाठी ते फिर्यादीकडे आले होते. त्यांनी ही मिळकत विकसनासाठी दिली असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वायरिंगचे खोदकाम करण्यास नकार दिला होता.

तरीही त्यांनी विकास पोखरणा व भारती एअरटेल कंपनीशी संगनमत करून फिर्यादी यांच्या नावावर असलेल्या मिळकतीमध्ये सिमेंट रस्त्यालगत टाकलेल्या पाईपद्वारे कोणतीही परवानगी न घेता मोठ्या इंटरनेटच्या वायर टाकण्याचे काम केले. त्यासाठी अजित सुरेश सातव याने फिर्यादी यांचा पुतण्या असल्याचे भासवून केवळ आडनाव सातव असल्याचा गैरफायदा घेत १ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांच्या खोट्या सहीचे संमती असल्याचे कागदावर हाताने लिहिले.

नोव्हेंबर २०१८ मध्ये स्टॅम्प पेपरवर अजित सातव याने खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्यांच्या मिळकतीमध्ये २ हजार २७५ मीटर ऑप्टिक फायबर केबल टाकण्यास परवानगी असल्याचे लिहून दिले. त्यासाठी फिर्यादी यांच्या पत्त्यावर सातव लँडमार्क या बोगस फर्मचे बँक खाते उघडले. त्यात भारती एअरटेलकडून १७ लाख ६ हजार २५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट घेतला. त्यातून १ लाख ८९ हजार ५८३ रुपये टीडीएस कट करून ही रक्कम देण्यात आली होती.

भारती एअरटेल या कंपनीने मिळकतीची कागदपत्रे, मालकीबाबतची कोणतीही कागदपत्रे तपासून न घेता तसेच ऑप्टिक फायबर केबल टाकण्यासाठी फिर्यादी यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. भारती एअरटेलचा कर्मचारी विकास पोखरणा याने बेकायदेशीर कागदपत्रे बनवून केबल टाकून आजूबाजूला असणाऱ्या सोसायट्यांना इंटरनेट कनेक्शनचा पुरवठा केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.

कंपनीच्या कागदपत्रांवरून झाला उलगडा
आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांना २५ जुलै २०२३ रोजी लक्षात आले. त्यांनी अ‍ॅड. विवेक चव्हाण यांच्या मार्फत भारती एअरटेल कंपनीच्या हरियाणा मुख्य शाखेला तसेच पुणे शाखेला नोटीस पाठविली. तेव्हा त्यांनी पाठवलेल्या कागदपत्रांवरून अजित सातव याने फिर्यादी यांचा पुतण्या असल्याचे भासवून बनावट सातव लँडमार्क नावाने त्यांच्या पत्त्यावर बनावट फर्म स्थापन केली. कंपनीला ना-हरकत पत्र देऊन स्वतः १७ लाख रुपये घेऊन फिर्यादी यांचे ४२ लाख रुपयांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी न्यायालयात तक्रार केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.