आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 5, 2026
Spread the love

बार्शी : आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात, सामाजिक सलोखा राखून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन बार्शी शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी उपविभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, प्रशासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच DJ, Dolby, Banjo व मंडप व्यावसायिकांची बैठक शनिवारी (दि. ५) कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, पांडे चौक, बार्शी येथे पार पडली.

बैठकीस सोलापूर ग्रामीण चे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, तहसीलदार एफ. आर. शेख, बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विक्रांत चव्हाण, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आनंद उपरे यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पांगरी पोलीस ठाण्याचे साईनाथ सुरवसे, माढा पोलीस ठाण्याचे राहुल शिंदे, वैराग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आमोल कादभाने, बार्शी शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील धनवे, प्रदीप झालटे, समीर ढोरे, बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुळ यांच्यासह पोलीस अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, DJ/Dolby/Banjo व्यावसायिक, मंडप व्यावसायिक तसेच बार्शी उपविभागातील सुमारे ४०० ते ५०० नागरिक उपस्थित होते.

बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवानग्यांसाठी ऑनलाइन अर्ज करून स्थानिक प्रशासनाची नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मंडप उभारताना वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

‘गणराया अवॉर्ड’ची माहिती पत्रकार सचिन वायकुळे यांनी दिली. बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीतील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी ‘गणराया अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. पारंपरिक संस्कृतीचे जतन, ध्वनिप्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक सलोखा, शिस्त, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य तसेच समाजोपयोगी व विधायक उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘No DJ, No Dolby’ उपक्रमाच्या अनुषंगाने गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये DJ व Dolbyचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. आक्षेपार्ह देखावे, बॅनर, होर्डिंग अथवा सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होईल असे साहित्य प्रदर्शित करू नये, अशा स्पष्ट सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या.

गणेशमूर्ती व मंडपाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गणेश मंडळाने CCTV कॅमेरे बसवावेत तसेच गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळाच्या सदस्यांची दिवस-रात्र २४ तास नियोजनबद्ध पद्धतीने नियुक्ती करावी, असे सांगण्यात आले. कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीने वर्गणी अथवा देणगीची मागणी करू नये, अशी सूचनाही देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या कालावधीत वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, आरोग्य शिबिरे व इतर समाजोपयोगी विधायक उपक्रम राबविण्यास गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह, धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे पोस्ट, फोटो, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित करू नयेत. जातीय व धार्मिक सलोखा अबाधित ठेवून शांतता व सुव्यवस्था राखावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून शांतता, शिस्त, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक, व्यावसायिक आणि सर्व संबंधित घटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सोलापूर ग्रामीण चे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले. बैठकीची प्रस्तावना बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी केली, तर वैराग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आमोल कादभाने यांनी आभार प्रदर्शन केले.