आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘पुणे सांस्कृतिक महोत्सव २०२६’ व ‘राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा’ उत्साहात संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 7, 2026
Spread the love

पुणे : राजे शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि राजे शिवराय बहुउद्देशीय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वर्षांच्या गौरवशाली समाजसेवेच्या वाटचालीनिमित्त ‘पुणे सांस्कृतिक महोत्सव २०२६’ तसेच ‘राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २८) बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला.

‘संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा उत्सव’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या सोहळ्यात शिवविचार, समाजसेवा, संस्कृती जतन आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘मोफत शस्त्र प्रदर्शन’ ठरले. यामध्ये शिवकालीन ऐतिहासिक साधनांची अद्भुत झलक नागरिकांना पाहायला मिळाली.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांनी केले. स्वागताध्यक्ष म्हणून जेजुरी संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. राजकुमार लोढा उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन राजे शिवराय प्रतिष्ठान व बहुउद्देशीय फाउंडेशनचे संस्थापक-सचिव किरण घोरतळे पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

पुणे सांस्कृतिक महोत्सवात ४५ शालेय संघांनी सहभाग घेतला. भव्य शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमास नागरिकांचा व शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील २१ मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिजीत औटी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अँड युनिव्हर्सिटी, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. बिपिन सुळे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे दर्शन घडविले.

राजे शिवराय प्रतिष्ठानचे सचिव किरण घोरतळे पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. संस्थेला यंदा १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे सांस्कृतिक महोत्सव तसेच राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षांच्या सामाजिक कार्यातून शिक्षण, संस्कृती आणि समाजसेवेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते भव्य शस्त्र प्रदर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेची आणि ऐतिहासिक वारशाची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक तसेच पुणेकरांनी मोठ्या उत्साहाने भेट दिली. प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद हा महोत्सवाच्या यशाची विशेष नोंद ठरला.

महिलांसाठी भव्य मोफत लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमालाही महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रम, शस्त्र प्रदर्शन आणि लकी ड्रॉ यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड व बाबासाहेब काळे यांनी प्रभावीपणे केले. यावेळी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, वृषालीताई कामठे, अर्चनाताई जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, विश्वजीत जगताप, सामाजिक कार्यकर्ते आबिद भाई पठाण, प्रभाकर बाबा कदम, गोकुळ घोरतळे, किशोर खोरदे, दिलीप परदेशी, सुनील परदेशी, अरुण डमाळ आणि नागनाथ काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, मित्रपरिवार आणि पुणेकर नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल किरण घोरतळे पाटील यांनी आभार प्रदर्शनातून सर्वांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देतानाच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि शौर्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देणारा हा महोत्सव उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्मरणीय ठरला.