१५० विद्यार्थ्यांच्या हातून साकारला पर्यावरणपूरक बाप्पा
लिओ लायन्स क्लबच्या उपक्रमातून घराघरात इको-फ्रेंडली गणपतीचा संदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी ; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथ यांच्या वतीने रविवारी (६ सप्टेंबर) श्री भगवंत मंदिर, बार्शी येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत तब्बल १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.
या उपक्रमात सुलाखे हायस्कूल, बार्शी तसेच साधना कन्या प्रशाला, बार्शी या दोन्ही शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षक दीपक माने, दीपक दुधनकर आणि हरिदास कुंभार यांनी विशेष प्रोत्साहन दिले तसेच मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना मुक्त वाव देत विविध रूपांतील गणेशमूर्ती साकारल्या. काही विद्यार्थ्यांनी लालबागचा राजा, श्री दगडूशेठ गणपती, तर काहींनी शंकराच्या अवतारातील गणेशमूर्ती, मोरावर विराजमान गणपती अशा आगळ्यावेगळ्या संकल्पना शाडू मातीमध्ये साकारल्या. याशिवाय विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून विविध आकार, मुद्रा आणि रूपांतील गणेशमूर्ती तयार केल्या. त्यामुळे संपूर्ण कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे सुंदर दर्शन घडले.
‘माझ्या हाताने माझा बाप्पा’ या भावनेने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. माती मळण्यापासून गणेशमूर्तीला अंतिम आकार देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मूर्तीमध्ये त्याची स्वतंत्र कल्पना आणि कलात्मकता दिसून आली.
या कार्यशाळेत शिल्पकार संजय उपरे व शिल्पकार गजेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याच्या विविध टप्प्यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मूर्तीचा आकार, मातीचा योग्य वापर आणि मूर्तीला सुबक स्वरूप देण्याच्या विविध बारकाव्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यशाळेची ‘Creativity | Concentration | Sustainability’ ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रत्यक्षात उतरली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या उपक्रमासाठी अध्यक्ष लिओ लायन पवन श्रीश्रीमाळ, सचिव लिओ लायन उदयन सावंत, खजिनदार लिओ लायन गौरव सुराणा, प्रकल्प प्रमुख लिओ लायन यश कुंकुलोल, लिओ लायन तेजस रायचूरकर, आदित्य सोनिग्रा, गौरव देढिया, राधिका रायचूरकर, रोनक कुंकुलोळ, अनिष श्रीश्रीमाळ, विराग दोशी, शुभम मेहता, पलक कुंकुलोळ आणि गोविंदराज बंडेवार यांनी नियोजन केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
१५० विद्यार्थ्यांच्या हातून साकारलेल्या विविधरंगी आणि कल्पक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. प्रसिद्ध गणेशरूपांपासून ते विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून साकारलेल्या आगळ्यावेगळ्या रूपांपर्यंत अनेक गणेशमूर्तींनी कार्यशाळेची शोभा वाढवली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवून तो घराघरात पोहोचविण्याचा लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा मुख्य उद्देश
“विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची सवय लागावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्याने त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, एकाग्रता आणि पर्यावरणाविषयीची जबाबदारी निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचावा, हा आमचा प्रयत्न आहे.” – पवन श्रीश्रीमाळ, अध्यक्ष : लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथ
