शंकरराव पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जयंती उत्साहात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूडचे शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे सांस्कृतिक समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, उपसचिव, विद्या विकास मंडळ, पाथरूड उपस्थित होते. कदम नंदलाल यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शिक्षक दिनाचे महत्त्व तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक व तत्त्वज्ञानविषयक कार्याचा आढावा घेतला. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देणारा मार्गदर्शक असतो, हा विचार यावेळी अधोरेखित करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ. संतोष शिंदे यांनी शिक्षकांच्या बदलत्या भूमिकेवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता विकसित करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. अनुराधा जगदाळे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारांमधून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समिती, IQAC, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगमा शेख यांनी केले. तसेच रोशनी जाधव यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.
