आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणार्‍या रेकॉर्डवरील चोरट्याला मुंबईतून जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 7, 2026
Spread the love

पुणे : कात्रजमधील मांगडेवाडी येथील ३ फ्लॅट भरदिवसा फोडून घरातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेणार्‍या ४ चोरट्यांपैकी एकाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने मुंबईहून जेरबंद केले.

फकरुद्दीन इमामुद्दीन शाह (वय ३९, रा. घाटकोपर, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याचे साथीदार फरार आहेत.

याबाबत सराफ प्रविण प्रताप सावंत (वय ३७, रा. ओम रेसिडेन्सी, पुनम पेट्रोल पंपाजवळ, मांगडेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे वेदिका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. २२ ऑगस्ट रोजी ते दुपारी दुकानात गेले होते. त्यांची पत्नी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान दुकानात आल्या. त्या दुपारी १ वाजता पुन्हा घरी गेल्या. या एक तासाच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील सोन्याची चैन, टॉप्स, कानातील रिंगा, लॅकेट, चांदीचे पैंजण असा १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

त्यांच्या शेजारील शिवालय सोसायटीतील दोन घरे फोडून चोरट्यांनी एकूण सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक करीत होते. पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे व प्रदीप राठोड यांनी घटनास्थळ व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ४ चोरटे सिल्व्हर रंगाच्या वेगनर गाडीतून घटनास्थळी येऊन घरफोडी करून गेल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे व पोलीस अंमलदार अजित शिंदे यांना मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता, घरफोडी करणारे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते सध्या मुंबई येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथक मुंबईला रवाना झाले. त्यांनी फकरुद्दीन शाह याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

अधिक चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा इतर साथीदारांसोबत मिळून केल्याची कबुली दिली. त्याने साथीदारांसोबत रायगड, सिंधुदुर्ग व नाशिक परिसरातदेखील घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या साथीदारांचा भारती विद्यापीठ पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, रवींद्र लोखंडे, अजित शिंदे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर आणि साधना पवार यांनी केली आहे.