आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 7, 2026
Spread the love

पुणे : दहीहंडी कार्यक्रमात कार्यक्रम सादर करताना अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. या आदेशानुसार प्रमाणपत्र सादर न केल्याने मंडळाला कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. असे असताना कार्यक्रम करणाऱ्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष व आयोजकावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर, भाग १, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांची महाराष्ट्रात सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त लावणी सादर करण्यासाठी गावोगावी बोलावले जाते. त्याला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळतो. रविवारी सुखसागरनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.

याबाबत पोलीस हवालदार नंदलाल हरिचंद्र भादले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवासाठी एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण सोनवणे यांनी लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी परवानगी मिळण्यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विषयाबाबत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या रंगभूमी मंडळांची कार्यपद्धती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्त्वे निश्चितीबाबत व त्याप्रमाणे मंडळाचे कार्य चालण्याबाबत पोलीस प्रशासनाला पत्र मिळाले होते. या पत्रान्वये भूषण सोनवणे यांना कार्यक्रमाच्या अनुषंगाने विहित नमुन्यामध्ये परवानगीसाठीची कागदपत्रे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्राधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.

असे असताना दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक गरड व त्यांचे सहकारी मंडळांना भेटी देत होते. एम्पायर ग्रुप ए के बॉइज या मंडळाला परवानगी नाकारली असताना कार्यक्रम आयोजित करून आदेशाचा भंग केल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष, आयोजक व लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.