आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी शहर पोलिसांची दमदार कारवाई, कॉपर वायर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 7, 2026
Spread the love

बार्शी : बार्शी शहरातील परांडा चौक परिसरातील वाइंडिंग वर्कशॉपच्या गोदामातून लाखो रुपयांची कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली संपूर्ण कॉपर वायर, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप तसेच वायर कापण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ६ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. टोळीतील चौथा आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथील पप्पू श्रीमंत रगडे (वय ३५) यांचे परांडा चौक, बार्शी येथे वाइंडिंग वर्कशॉपचे गोदाम आहे. दि. १२ ते १३ जून २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उघडून आत ठेवलेले १ लाख ९३ हजार ८०० रुपये किमतीचे २०४ किलो वजनाचे पाच कॉपर वायरचे बंडल चोरून नेले होते.

याप्रकरणी रगडे यांच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६३/२०२६, बी.एन.एस. कलम ३०३ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

मिळालेल्या माहितीवरून कोल्हापूर परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सागर आकाराम गोसावी (वय ४१, रा. गडमुंडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), हणमंत राजाराम सपोनिसी (वय ४०, रा. त्रिबोली मंदिर, टेबलाई नाका, कोल्हापूर) आणि दुर्गाप्पा रामाप्पा कल्याणी (वय ४८, रा. त्रिबोली मंदिर, टेबलाई नाका, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

या गुन्ह्यातील मंजूनाथ (रा. टेबलाई नाका, कोल्हापूर) हा चौथा आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चोरीस गेलेले १ लाख ९३ हजार ८०० रुपये किमतीचे पाच कॉपर वायर बंडल, गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप (क्र. एमएच १० बीआर १४११) तसेच वायर कापण्यासाठी वापरलेले कटर व इतर साहित्य, अंदाजे ४ हजार रुपये किमतीचे, असा एकूण ६ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या टोळीचा आंतरजिल्हा अथवा आंतरराज्यीय गुन्हेगारीशी संबंध आहे का, तसेच त्यांनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोलीस हवालदार प्रवीण साठे, सुनील बनसोडे, महिला पोलीस हवालदार शबाना कोतवाल, सचिन नितनात, अविनाश पवार, राहुल उदार, अंकुश जाधव, सचिन देशमुख, अजिज शेख, दत्ता सोमवाड, प्रल्हाद अकुलवार, सतीश उघडे, सचिन राऊत, संतोष जाधवर, धनराज फत्तेपूरे, लक्ष्मण शेळके तसेच सायबर पोलीस ठाण्याचे राहूल सोनकर यांचा समावेश होता.