रिजन वन गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
१७ गुणवंत शिक्षकांचा ‘प्रिती रंजन गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ डी १, रिजन १ यांच्या वतीने आयोजित ‘प्रिती रंजन रिजन १ गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ’ शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवस्मारक, शिंदे चौक, नवी पेठ, सोलापूर येथे उत्साहात संपन्न झाला. रिजन चेअरमन ला. डॉ. महेश नळे यांच्या निमंत्रणाखाली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात रिजनमधील १७ गुणवंत शिक्षकांचा ‘प्रिती रंजन गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. कर्नल प्रकाश तानुबाई आण्णा महानवर यांची शुभहस्ते उपस्थिती होती.
मा. डॉ. शिवरत्न शेटे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच प्रांतपाल ला. राजेंद्र शहा-कांसवा PMJF, प्रथम उपप्रांतपाल ला. डॉ. किरण खोराटे MJF, द्वितीय उपप्रांतपाल ला. मंगेश दोशी PMJF, रिजन सेक्रेटरी ला. गंगाप्रसाद बंडेवार, फर्स्ट लेडी ला. प्रिती नळे यांच्यासह रिजन व झोनमधील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी आराध्या नळे हिच्या णमोकार मंत्र पठणाने झाली. त्यानंतर झोन चेअरमन ला. अॅड. अमिता कारंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
रिजन चेअरमन ला. डॉ. महेश नळे यांनी प्रास्ताविकातून गुणवंत शिक्षक पुरस्काराची रूपरेषा मांडली. तसेच शिक्षक व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी कुलगुरू डॉ. कर्नल प्रकाश तानुबाई आण्णा महानवर यांचा परिचय ला. प्रा. उन्मेष आटपाडीकर यांनी, तर प्रमुख वक्ते डॉ. शिवरत्न शेटे यांचा परिचय ला. प्रा. डॉ. अर्चना आवटे यांनी करून दिला.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. महानवर व डॉ. शेटे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. झोन चेअरमन ला. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी गुणवंत शिक्षक पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिजन वनमधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यामध्ये सचिन पाटील, महादेव वाघोले, ज्योती डमरे, कल्पेश नष्टे, सुनीता ठोंबरे, सुहास काटगांव, वैशाली जुन्नरकर, जगदेवी कडगंची, गणेश कुडक्याल, सचिन उकिरडे, योगेश उपळकर, रविराज पाटील, सचिन बिराजदार, रामकृष्ण इंगळे, मोहन भोसले, महेश म्हेत्रे आणि विष्णू चौगुले या १७ शिक्षकांना ‘प्रिती रंजन गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या मनोगतानंतर कुलगुरू डॉ. कर्नल प्रकाश तानुबाई आण्णा महानवर यांनी शिक्षकांच्या भूमिकेविषयी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, आजच्या शिक्षकांनी बदलत्या ज्ञानाचा स्वीकार करून आजच्या पिढीला काय हवे आहे, हे स्वतः आत्मसात करावे. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन मायेने व ममतेने समजावून सांगत अध्यापन करावे. आजची पिढी हळव्या मनाची असल्याने शिक्षकांची भूमिका मातृत्वाची असावी, असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांवर संस्कारक्षम शिक्षण कशा प्रकारे बिंबविले, याविषयी मार्गदर्शन केले. एक चांगला शिक्षक कसा असावा, याचा दृष्टिकोन आपल्या संस्कृती व परंपरेतून प्राचीन काळापासून मिळालेला असून तो आजही तितकाच प्रासंगिक आहे, असे त्यांनी सांगितले.
माता जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या संस्कारक्षम शिक्षणाचे अनेक दाखले देत त्यांनी प्रेमळ व समर्पित शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये असीम क्षमता व प्रेरणा जागृत करू शकतो, असे स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कठीण आव्हानांना सामोरे जाण्याचा आणि सर्वोच्च ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रांतपाल ला. राजेंद्र शहा-कांसवा यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनविण्यासाठी मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे परम कर्तव्य असल्याचे सांगितले.
प्रथम उपप्रांतपाल ला. डॉ. किरण खोराटे यांचीही यावेळी उपस्थिती होती. द्वितीय उपप्रांतपाल ला. मंगेश दोशी यांनी लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या TTW उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमात उपविभागीय टप्प्यातील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणाची शिस्तबद्धता व नियोजन पाहून उपस्थित नातेवाईक व मित्रपरिवार अक्षरशः भारावून गेले.
यावेळी झोन चेअरमन ला. अॅड. अमिता कारंडे (झोन १), ला. स्वामीनाथ कलशेट्टी (झोन २), ला. प्रा. डॉ. अर्चना आवटे (झोन ३) आणि ला. प्रा. उन्मेष आटपाडीकर (झोन ४) यांच्यासह लायन्स क्लबचे विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन ला. डॉ. अभिजीत जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन झोन चेअरमन ला. प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिजनमधील माजी प्रांतपाल, कॅबिनेट ऑफिसर्स, उपविभागीय सभापती, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व लायन्स सदस्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
