केतन अगरवाल खून प्रकरणी चेतनच्या मित्राला अटक
खुनाचा कट रचण्यात सहभागी : माहिती लपवून ठेवल्याचा आरोप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : उद्योजक केतन अगरवाल यांच्या खुनाच्या कटामध्ये सहभागी असल्याचे पुरावे हाती लागल्याने चेतन चौधरी याचा मित्र रितेश हांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी दिली.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी रितेश हांगे (वय २३, रा. बालेवाडी, मूळ रा. बीड) याला अटक केली आहे. याबाबत माहिती देताना संदिपसिंग गिल यांनी सांगितले की, रितेश हांगे हा चेतन चौधरी याचा बालपणापासूनचा मित्र आहे.
रितेश हा पदवीधर असून तो एका खासगी बिल्डरकडे कमिशन एजंट म्हणून काम करतो. केतन अगरवाल याचा खून झाल्यानंतर याची माहिती कोणाकोणाला असेल, याची चौकशी केल्यावर त्याचेही नाव पुढे आले होते.
त्याच्याकडे सुरुवातीला चौकशी केली. त्याचा जबाब नोंदविला होता. परंतु, त्याने अपूर्ण माहिती दिली होती. त्याचा या खुनाचा कट रचण्यात सहभाग होता.
चेतन याने खून केल्यानंतर एका ठिकाणी भेटून रितेश याला आम्ही खून कसा केला, याची माहिती दिली होती. याबाबतचे स्पष्ट पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी यामध्ये ६१ (२) कलमान्वये रितेश हांगे याला अटक केली आहे.
चेतन चौधरी याचा रितेश हा मित्र असून तो सिया गोयल हिलाही ओळखतो. केतनला मारण्यासाठी त्यांनी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्याचा कट रचला होता.
त्यातही रितेश याचा सहभाग होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच हे कृत्य करण्याचे ठरविल्यानंतरच्या गुन्हेगारी कटात रितेश याचा सहभाग होता.
रितेश हांगे हा लोहगडावर गेला होता की नाही, याविषयी पोलीस कोठडीदरम्यान चौकशी करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी सांगितले.
