तांब्याच्या तारा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून चोरी : ८ गुन्हे उघडकीस, १२ लाख ७३ हजारांचा माल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाने जेरबंद केले. या टोळीतील तिघांना पकडून पोलिसांनी ६ गुन्हे उघडकीस आणून १२ लाख ७३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
मोहम्मद साहेबजान मंगेरखान (वय ३०), आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२), चंद्रसेन शिवरतन धारिया (वय २८, तिघे सध्या रा. गोटेमाळ, सासवड, जि. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.
पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, लोणीकंद परिसरातील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या.
पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हवेली तालुक्यातील वाडेगाव येथे काही ट्रान्सफॉर्मर चोरी करणारे चोरटे येणार आहेत.
या माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून पाठलाग करून एका संशयित मालवाहू टेम्पोसह त्यातील तिघांना ताब्यात घेतले.
त्यांनी मागील ५ ते ६ महिन्यांत लोणीकंद परिसरातील वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस व हिंगणगाव येथून एकूण ८ ट्रान्सफॉर्मर / रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे कबूल केले. त्यांना ६ सप्टेंबर रोजी अटक करून त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, भरत उर्किडे, अमोल ढोणे, विकास कदम, निर्णय लांडे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, किरण पलांडे, नेहा तापकीर, बाळासाहेब तनपुरे, समाधान पाटील, भरत गुंडवाड, प्रतिक्षा पानसरे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.
