आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रेल्वे पोलीस अंमलदारावर टोळक्याचा चाकू हल्ला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 8, 2026
Spread the love

पुणे : विकीच्या आईला तो दारू व गांजा पितो, असे सांगितल्याच्या संशयावरून चौघांनी रेल्वे पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या गळ्यावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले आहे.

पोलीस अंमलदार अक्षय महादेव बोबांळे (वय २८, रा. पुना गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विशाल विकी रणजित पात्रौ (वय २४, रा. विजयनगर, दिघी), रॉकी रणजित पात्रौ (वय २०, रा. विजयनगर, दिघी) यांना अटक केली आहे.

त्यांच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोरील रोडवर सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय बोबांळे हे लोहमार्ग पोलीस दलात पोलीस अंमलदार आहेत. ते सोमवारी रात्री कामावरून जेवण करण्यासाठी लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील रोडवरून दुचाकीवरून जात होते.

त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीचे विकी पात्रो व रॉकी पात्रो आणि त्याचे दोन साथीदार यांनी त्यांना अडविले. अक्षय बोबांळे यांनी विकीच्या आईला तो दारू व गांजा पितो, असे सांगितले, असा गैरसमज करून घेतला.

त्यावरून अक्षय यांना, ‘तुला आता जिवंत सोडणार नाही,’ असे बोलून त्यांच्या साथीदारांनी अक्षय यांचे हातपाय पकडले. विकी याने धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला.

रॉकीने चाकूने अक्षय यांच्या छातीवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले. त्यात अक्षय हे गंभीर जखमी झाले. त्यांचा मोबाईल व दीड लाख रुपये किमतीची, गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे.