गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार गजाआड
चार गुन्ह्यांत ६ महिन्यांपासून होता वाँटेड : भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात दररोज होत असलेल्या गांजा विक्रीच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार, तसेच यापूर्वी दाखल असलेल्या ४ गुन्ह्यांतील वाँटेड तस्कर गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या तस्कराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
अजय पोपटराव पाडूळे (वय ३०, रा. नवी म्हाडा कॉलनी, हडपसर) असे या तस्कराचे नाव आहे. पुण्यात दररोज मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होते.
ही बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांमध्ये अजय पाडूळे हा प्रमुख असून तो मुख्य सूत्रधार आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये चारुदत्त काळुराम चव्हाण, अजय पाडूळे यांच्याविरुद्ध ३५ किलो गांजा विक्रीकरिता जवळ बाळगल्याचा गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्यातील आरोपी अजय पाडूळे हा गेल्या ६ महिन्यांपासून फरारी होता. पुण्यातील गांजा विक्रीच्या व्यवसायाचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते.
त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ याबरोबरच लोणी काळभोर व वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हे दाखल झाले आहेत. तो महाराष्ट्रातून परराज्यात पळून गेल्याचे तपासात पुढे आले होते.
भारती विद्यापीठ पोलीस त्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे यांना अजय पाडूळे हा आई व बहिणीला भेटण्यासाठी हडपसरमध्ये येणार असल्याचे समजले.
या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी हडपसरमधील पुरंदर चौक येथील नवी म्हाडा कॉलनी येथे सापळा रचून अजय पाडूळे याला ५ सप्टेंबर रोजी पकडले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे यांनी केली आहे.
