हर्बल घटकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
यकृतविकारांसाठी सौरभ वाघमारे यांचे अभिनव संशोधन : भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : यकृताच्या आजारांसाठी नैसर्गिक जैवसक्रिय घटकांचा अधिक प्रभावीपणे उपयोग करण्याच्या उद्देशाने संशोधक सौरभ संजय वाघमारे यांनी आधुनिक औषध वितरण तंत्रज्ञानावर आधारित अभिनव संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर झाले आहे. Rutin आणि Phyllanthin या नैसर्गिक जैवसक्रिय घटकांचा समावेश असलेली आधुनिक फायटोसोम-आधारित औषधी संरचना त्यांनी विकसित केली आहे. यकृताच्या आरोग्याशी संबंधित उपचारांसाठी भविष्यात या तंत्रज्ञानाचा उपयोग होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रहिवाशी सौरभ संजय वाघमारे यांनी सुलाखे हायस्कूल बार्शी येथून पहिली ते दहावी शिक्षण घेऊन पुढील शिक्षण एम. फार्मसी तसेच पीजीडीआयपीआर हे शिक्षण पूर्ण केले असून, सध्या AcSIR (Academy of Scientific and Innovative Research) अंतर्गत पीएच.डी.चे शिक्षण घेत आहेत. AcSIR ही CSIR अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय स्तरावरील संशोधन व उच्च शिक्षण संस्था आहे. वाघमारे हे सध्या CSIR-URDIP, पुणे येथे कार्यरत असून औषधनिर्मिती, संशोधन आणि बौद्धिक संपदा क्षेत्राशी संबंधित काम करीत आहेत.
यकृतविकारांसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करताना त्यांची कमी विद्राव्यता, मर्यादित शोषणक्षमता आणि कमी जैवउपलब्धता या प्रमुख अडचणी येतात.
या अडचणींवर मात करण्यासाठी वाघमारे यांनी आधुनिक फायटोसोम औषध वितरण तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे Rutin आणि Phyllanthin या घटकांचा विशेष वितरण प्रणालीमध्ये समावेश करून त्यांच्या शरीरातील उपलब्धता आणि स्थिरता सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विकसित करण्यात आलेल्या औषधी संरचनेचे वैज्ञानिक मूल्यमापन करताना अतिनील प्रकाश शोषण अभ्यास, प्रमाण निश्चिती अभ्यास, भौतिक-रासायनिक वैशिष्ट्यांचे परीक्षण, औषध अंतर्भाव कार्यक्षमता, कणांचा आकार आणि प्रतिऑक्सिडंट क्रियाशीलता यांसारख्या विविध बाबींचा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासातून विकसित फायटोसोम औषधी संरचनेमध्ये आशादायक गुणधर्म आढळून आले आहेत. त्यामुळे नैसर्गिक जैवसक्रिय घटकांचा आधुनिक औषधनिर्मितीमध्ये अधिक प्रभावीपणे वापर करण्याच्या दृष्टीने या संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे हर्बल जैवसक्रिय घटकांना आधुनिक औषध वितरण तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. पेटंट मंजुरीमुळे या तंत्रज्ञानाच्या बौद्धिक संपदा संरक्षणाला मान्यता मिळाली आहे.
भविष्यात आवश्यक पूर्व-वैद्यकीय, वैद्यकीय आणि नियामक मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यास, या तंत्रज्ञानाच्या आधारे यकृताच्या आरोग्यासाठी हर्बल औषधी उत्पादने तसेच इतर आरोग्यविषयक औषधी संरचना विकसित करण्याची शक्यता आहे.
सौरभ संजय वाघमारे यांच्या या संशोधनातून नैसर्गिक वनस्पतीजन्य घटक, आधुनिक औषधनिर्मिती तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा यांचा प्रभावी संगम साधण्याचा प्रयत्न झाला आहे.
भारतीय पेटंट कार्यालयाकडून मिळालेली पेटंट मंजुरी ही त्यांच्या संशोधनातील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. यकृताच्या आरोग्यासाठी आधुनिक आणि प्रभावी औषध वितरण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने हे संशोधन महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
