जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
७० हून अधिक जबरी चोरीचे गुन्हे : चतु:श्रृंगी पोलिसांनी पाठलाग करून पकडले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ७० हून अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला चतु:श्रृंगी पोलिसांनी सोलापूर रोडवर पाठलाग करून पकडले. औंध येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना चतु:श्रृंगी पोलिसांनी परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगाराचा माग काढला होता.
राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. आर्वी, साई रोड, जि. लातूर, मूळ रा. एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
औंध परिसरातून २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता एक महिला पायी जात असताना दुचाकीवरील चोरट्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते.
चतु:श्रृंगी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सलग १० दिवस औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सुस, लवळे, धायरी, नाना पेठ आणि हडपसर या परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
त्यातून ही जबरी चोरी राजू राठोड यानेच केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावरून त्याचा शोध घेत असताना तो पिंपळे निलख येथे दिसून आला. त्यानंतर रात्रभर पोलीस पथक त्याचा शोध घेत होते.
तो सोलापूर रोडच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आले. तो लातूरला जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर आपला मोर्चा वळविला.
त्यावेळी स्पोर्ट्स बाईकवरून एक जण जाताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून हडपसर परिसरात त्याला पकडले.
त्याच्याकडून मोटारसायकल आणि चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे आणि पोलीस निरीक्षक शितल जाधव यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार शिर्के, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, भुवनेश पवार, रवींद्र दहातोंडे, अजित गायकवाड, योगेश बडगे आणि सूर्यकांत मानकुंबरे यांनी केली.
एकटाच करायचा जबरी चोरीचे गुन्हे – महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने दोन चोरटे सहभागी असतात. दुचाकी चालविणारा चोरटा गाडी महिलेच्या जवळ नेतो, तर पाठीमागे बसलेला चोरटा तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळून जातो. काही वेळा पाठीमागे बसलेला चोरटा खाली उतरून महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावतो आणि पळत जाऊन मोटारसायकलवर बसतो. त्यानंतर दोघेही पळून जातात, असे अनेक गुन्ह्यांमध्ये दिसून येते. परंतु, राजू राठोड हा एकटाच अशा जबरी चोऱ्या करीत होता. त्याच्यावर यापूर्वी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक शहर आणि सातारा अशा विविध ठिकाणी ७० पेक्षा अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा एकटाच जबरी चोरी करत असल्याचे दिसून आल्याने राजू राठोड याची ओळख पटली होती.
