कोंढव्यात तरुणावर गोळीबार
पूर्ववैमनस्यातून कृत्य : डाव्या पायाच्या पोटरीतून गोळी गेली आरपार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वैमनस्यातून तरुणावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. गोळीबारात तरुण जखमी झाला असून, या प्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ अनिल त्रिबंके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोह उर्फ चिक्क्या सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबारात सौरभ त्रिंबके जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि त्याचा मित्र ७ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास लक्ष्मीनगर भागातील गणपती मंडळाच्या मांडवाजवळ गप्पा मारत थांबले होते.
सौरभचा मित्र सागर पंधरकर याच्याशी आरोपींचे वाद झाले होते. आठ ते दहा आरोपी मांडवाजवळ आले. त्यांनी सौरभला शिवीगाळ केली. त्याच्यावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला.
गोळी सौरभच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबारानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजवली.
जखमी झालेल्या सौरभला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र डोके तपास करत आहेत.
