आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सहायक पोलीस निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 9, 2026
Spread the love

पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला सापळा रचून रंगेहाथ पकडले.

कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५, रा. क्वीन टॉवर शेजारी, महादेव नगर, मांजरी) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सध्या तो लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नियुक्तीला आहे.

तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध फसवणूकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर याच्याकडे होता.

तक्रारदार व मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांचा मुलगा प्रतिक याचा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

त्यामध्ये मदत करण्याकरीता कृष्णा बाबर याने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच या गुन्ह्यात लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ सप्टेंबर २०२६ रोजी ही तक्रार आली होती़ त्याच दिवशी त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात कृष्णा बाबर याने दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मांजरीतील शितलादेवी मंदिरासमोर कारमध्ये तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृष्णा बाबर याला पकडण्यात आले.

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कृष्णा बाबर याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उप अधीक्षक सतिश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर, पोलीस हवालदार दीपक काकडे, पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, वैशाली माकर यांनी केली आहे.