आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रिक्षा प्रवासात वृद्धाचे दागिने चोरणारे चोरटे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 9, 2026
Spread the love

पुणे : शेअर रिक्षामधून प्रवास करीत असताना सहप्रवासी असल्याचे भासवून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेणाऱ्या तिघा चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

शाकीर जाकीर तेली (वय २९, रा. संतोषनगर, कात्रज) व त्याचे साथीदार मोसीन खान नूर खान (वय ३१, रा. एमएनपी कर्मचारी क्वार्टर, गेंदालाल मिल, जळगाव), इस्माईल ऊर्फ राजू शब्बीर शेख (वय ५०, रा. एकता हॉलच्या मागे, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांचा साथीदार गणेश ऊर्फ मेमरी (रा. जळगाव) हा फरारी आहे. ज्येष्ठ महिला नागरिक १४ जून २०२६ रोजी पावर हाऊस चौक ते भवानी पेठ असा रिक्षाने प्रवास करीत होती.

रिक्षामधील चार जणांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली होती. या गुन्ह्याच्या तपासात गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, हे आरोपी जळगाव येथील असून ते वयोवृद्ध व्यक्तींना प्रवासादरम्यान एकट्यामध्ये गाठून हातचलाखीने त्यांच्याकडील किमती ऐवज चोरतात.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन शाकीर तेली याला सर्वप्रथम अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याच्या साथीदारांची नावे समोर आली.

त्याचे दोन साथीदार मोसीन खान व इस्माईल शेख हे गुन्हा करण्याच्या तयारीत असताना मालधक्का चौकात मिळून आले. दोघांना अटक करण्यात आली.

या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे शहरातील सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, सहायक पोलीस फौजदार पागार, हवालदार रोहिदास वाघेरे, इम्रान शेख औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, गंगावणे, पोलीस अंमलदार अविनाश दरवडे, चौधरी, यादव यांनी केली आहे.