आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कुराश खेळाच्या दीड हजार बनावट प्रमाणपत्रांचे वाटप

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 9, 2026
Spread the love

पुणे : स्पर्धा आयोजित न करता, प्रत्येकी ३ ते ५ लाख रुपये घेऊन राज्यभरात कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे वाटण्यात आली. या प्रमाणपत्रांचा गैरफायदा घेऊन तब्बल ७१ बनावट खेळाडूंनी शासकीय नोकरी पटकावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या शिपाई भरती प्रक्रियेतही कुराश खेळाच्या बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून १९ जणांनी नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे.

गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन उपस्थित होते.

याप्रकरणी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

आरोपींनी कुराश या खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न झालेल्या व्यक्तींना खेळाडू असल्याचे दाखवून प्रमाणपत्रे दिली. या प्रमाणपत्रांचा वापर राज्य सरकारच्या विविध विभागांमधील भरती प्रक्रियेत करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शासनाच्या विविध विभागांतील भरतीमध्ये खेळाडूंसाठी ५ टक्के आरक्षण आहे. याच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाला का, याचा तपास पोलिसांकडून आता करण्यात येत आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुणे शहर पोलीस दलातील भरतीमध्ये अशा प्रमाणपत्रांच्या आधारे १९ उमेदवारांनी खेळाडू आरक्षणाचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

त्यापैकी दहा जण प्रशिक्षणासाठी गेले आहेत, तर अन्य नऊ जणांचे प्रशिक्षण अद्याप सुरू झालेले नव्हते. भरती प्रक्रियेदरम्यान या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची क्रीडा विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती आणि त्यांना मान्यताही देण्यात आली होती.

त्यामुळे प्रमाणपत्रांची पडताळणी नेमकी कोणत्या आधारावर करण्यात आली, याचाही तपास केला जाणार आहे. या प्रकरणात काही स्पर्धा प्रत्यक्ष झाल्याचे तपासात समोर आले आहे; मात्र, काही स्पर्धा केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्या.

त्यामुळे प्रत्येक प्रमाणपत्र स्वतंत्रपणे तपासण्यात येणार आहे. संबंधित स्पर्धा प्रत्यक्ष कुठे आणि कधी झाल्या, त्यामध्ये कोण सहभागी झाले, निकाल काय होता, तसेच प्रमाणपत्रे देताना कोणती प्रक्रिया पाळण्यात आली, याची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे.

तपासात महाराष्ट्रातील संबंधित संघटना ही राष्ट्रीय स्तरावरील संघटनेशी संलग्न असणे अपेक्षित असताना तसे नसल्याची माहिती समोर आली आहे.

असे असतानाही संबंधित संस्थेकडून खेळाडूंना प्रमाणपत्रे कशी देण्यात आली आणि त्या प्रमाणपत्रांना शासकीय भरती प्रक्रियेत मान्यता कशी मिळाली, याचा तपास सुरू आहे.