लिओ लायन्स क्लबतर्फे साधना कन्या प्रशालेत दंत तपासणी
विद्यार्थिनींना दातांच्या स्वच्छतेचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : लिओ लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन यूथ व साधना कन्या प्रशाला, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थिनींसाठी दंत तपासणी व दंत आरोग्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींची दंत तपासणी करून दातांची योग्य निगा व मौखिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी दंतचिकित्सक डॉ. आदिती देशमुख यांनी डेंटल मॉडेलच्या साहाय्याने योग्य पद्धतीने ब्रश करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
दिवसातून दोन वेळा किमान दोन मिनिटे दात घासावेत, दातांच्या सर्व भागांची स्वच्छता करावी तसेच साधारण तीन महिन्यांनी किंवा ब्रशचे ब्रिसल्स झिजल्यानंतर टूथब्रश बदलावा, असे त्यांनी सांगितले.
दंतचिकित्सक लिओ लायन डॉ. दिशा सोमाणी यांनी दातांच्या मधील अन्नकण व घाण स्वच्छ करण्यासाठी डेंटल फ्लॉसचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
साखरयुक्त पदार्थांचे अतिसेवन टाळणे, नियमित दंत तपासणी करणे व मौखिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लिओ लायन पवन श्रीश्रीमाळ यांनी दातांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना, “चॉकलेट, बिस्किटे व साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे दातांवर प्लाक साचून दात किडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे लहानपणापासूनच दातांची स्वच्छता, पौष्टिक आहार आणि नियमित दंत तपासणीची सवय लावणे गरजेचे आहे,” असे सांगितले.
यावेळी लिओ लायन्स क्लबचे उपाध्यक्ष लिओ लायन यश कुंकूलोळ, खजिनदार लिओ लायन गौरव सुराणा, प्रकल्प प्रमुख लिओ लायन डॉ. दिशा सोमाणी तसेच साधना कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका विनिता काळे, शिक्षक दीपक दुधनकर, तानाजी ढाळे व शिक्षिका महानंदा पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका विनिता काळे व शिक्षकांनी लिओ लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले. तरुण वयात समाजासाठी सकारात्मक योगदान देत आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या क्लबच्या सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले. बार्शी शहरात लिओ लायन्स क्लबचे सामाजिक कार्य उल्लेखनीय पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
