एमपीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
एमपीएससी आंदोलनात होता सहभाग : सुमारे ४ लाख रुपयांच्या कर्जामुळे संपवले जीवन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भाड्याने खोली घेऊन एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून घरातील बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रथमेश देशमुख (वय २८, रा. नंदन सोसायटी, शनिवार पेठ, मूळ रा. परांडा, जि. धाराशिव) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर जवळपास ४ लाख रुपयांचे कर्ज होते. त्याने ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्यांची दोन पानी यादी केली होती. त्यामध्ये कोणाकडून किती पैसे घेतले, त्यांची नावे आणि त्यापुढे रक्कम नमूद केली होती. ज्यांचे पैसे परत दिले होते, त्यांच्या नावापुढे बरोबरची खूण केली होती.
प्रथमेश देशमुख हा गेल्या चार वर्षांपासून पुण्यात भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याचे बी.एस्सी.पर्यंत शिक्षण झाले होते. परांडा येथे त्यांची अडीच एकर शेती आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, त्याची बहीण विवाहित आहे. एमपीएससीच्या परीक्षेत त्याला थोड्याशा गुणांनी अपयशाचा सामना करावा लागला होता. तो काहीसा अबोल होता. कोणाशीही तो आपल्या मनातील बाबी शेअर करत नव्हता. त्यामुळे त्याच्या मनात काय चालले आहे, हे त्याच्यासोबतच्या मित्रांना समजू शकले नाही.
बुधवारी सकाळी त्याने घरातील बेडशीटने गळफास घेतल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रथमेश देशमुख हा कर्जाचा बोजा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आलेले अपयश यामुळे तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव नातेवाईकांकडे सोपविण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले.
