गजा मारणे टोळीतील गुंड जेरबंद
मोक्काखाली होता गुन्हा दाखल : दीड वर्षांपासून फरार, गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गँगस्टर गजा मारणे याच्या टोळीतील सक्रिय गुन्हेगार आणि मोक्कासारख्या गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने हवेली तालुक्यातील वाडेबोलाई येथून जेरबंद केले.
श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार (वय ३९, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. गँगस्टर गजा मारणे व त्याच्या टोळक्याने एका अभियंत्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यात मोक्का कारवाई करण्यात आली. हा प्रकार घडल्यानंतर श्रीकांत पवार हा फरार झाला होता. गेल्या दीड वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकातील पोलीस अंमलदार अतुल साठे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, श्रीकांत पवार हा सध्या त्याच्या मित्राच्या वाडेबोलाई येथील अपना घर सोसायटीमध्ये राहत आहे.
या माहितीचे विश्लेषण करून खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वाडेबोलाई येथील अपना घर सोसायटीत छापा टाकून श्रीकांत पवार याला पकडण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार राजेंद्र नलावडे, अतुल साठे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, तुषार किंद्रे, विपुन गायकवाड, आशिष राठोड यांनी केली आहे.
