जादुटोणा करणार्या मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
कौटुंबिक अडचणी, शारीरिक व्याधी दूर करण्याचे आश्वासन : बांधकाम ठेकेदाराची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने बांधकाम ठेकेदाराची ४५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिबवेवाडी परिसरातील भोंदू महिला मोनाली विधाते हिच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदू महिलेने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोनाली विधाते, कृष्णा विधाते (दोघे रा. सुखसागरनगर, कात्रज), तसेच मोनालीचा भाऊ मयूर, अशोक बनकर आणि मंजू कौर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील रहिवासी आहेत. ते बांधकाम ठेकेदार आहेत. मोनाली विधाते हिच्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये कौटुंबिक अडचणी, पीडा दूर करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ विधाते हिने प्रसारित केले होते.
तक्रारदार हे डिसेंबर २०२५ मध्ये तिच्या संपर्कात आले. कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने मोनाली विधाते हिने हळदी-कुंकू, बाहुली आणि दोर पाठवून दिला. त्यानंतर तिने तक्रारदाराला बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरातील घरी बोलावले. कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखविले. तक्रारदाराला मृत्यूची भीती दाखवली.
पीडा दूर करण्यासाठी उतारा टाकावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात ४५ हजार ४०० रुपये घेतले. तक्रारदाराला जिवे मारण्याची, तसेच मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विधाते आणि तिच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनाली विधाते हिने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.
