आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नंबरप्लेट झाकणाऱ्या फॉर्च्युनर मालकाला अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 11, 2026
Spread the love

पुणे : रस्त्याने जात असताना अचानक फॉर्च्युनरची नंबरप्लेट झाकली जात असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी या फॉर्च्युनरच्या मालकाला अटक केली आहे.

विजय भगवान दगडे (वय ४४, रा. नरसिंह मंदिराजवळ, ताथवडे, ता. मुळशी) असे फॉर्च्युनरच्या मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय दगडे यांनी त्यांच्या टोयोटा कंपनीच्या फॉर्च्युनर कारच्या पाठीमागील बाजूच्या नंबरप्लेटवर आरटीओच्या परवानगीशिवाय नंबरप्लेट दिसू नये, या उद्देशाने नंबरप्लेट लपविण्यासाठी बनावटीकरण करून काहीतरी यांत्रिक फ्लिपिंग (उघडझाप करणारी) यंत्रणा बसवून घेतली होती.

ते गाडी घेऊन जात असताना पाठीमागील वाहनातील लोकांना अचानक नंबरप्लेट दिसेनाशी होत असल्याचे दिसून आले. त्यांनी याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला जात असल्याने तो काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

त्यामुळे वाकड पोलिसांनी या वाहनाच्या नंबरप्लेटवरून विजय दगडे याला फॉर्च्युनरसह पकडले. त्याने नंबरप्लेटमध्ये बनावटीकरण केल्याची कबुली दिली. वाहतूक शाखेचे चलन होऊ नये, आरटीओचे स्पीडिंग कॅमेरे, पोलीस नाकाबंदी, दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई टाळण्याच्या उद्देशाने, तसेच एखादा गंभीर स्वरूपाचा अपराध करून त्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी हा प्रकार केला. पोलीस वाहनापर्यंत पोहोचू नयेत, या उद्देशाने हा प्रकार केल्याचे समोर आले.

याद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून गुरुवारी दुपारी विजय दगडे याला अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच त्याला शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दीप्ती पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी वकिलांनी सांगितले की, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्याला जामीन मंजूर केल्यास तो असा गुन्हा पुन्हा करण्याची शक्यता आहे. साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. फॉर्च्युनर मालकाने हे पंजाबमध्ये बनवून घेतल्याचे सांगितले आहे. त्याने हे कोणाकडून करून घेतले, तसेच त्याने अशा प्रकारे आणखी काही कारच्या नंबरप्लेटमध्ये बदल करून दिले आहेत का, याचा तपास करायचा आहे.

बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. ऋषिकेश ताटे यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीची प्रत्यक्ष पोलीस कोठडीची गरज नाही. पोलिसांनी वाहन जप्त केले आहे. आरोपीला कोठडीत ठेवण्यामागे काहीही कारण नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने विजय दगडे याची २५ हजार रुपयांच्या बाँडवर जामिनावर सुटका केली.

१ लाखांहून अधिक दंड
पोलिसांनी ही फॉर्च्युनर कार ताथवडे येथील घरातून जप्त केली. आरटीओ अधिकाऱ्यांनी गाडीमध्ये बेकायदा फेरबदल केल्याप्रकरणी मालकाला साडेचार हजार रुपये दंड केला. जेव्हा पोलिसांनी या कारचा इतिहास तपासला, तेव्हा या फॉर्च्युनरवर आधीपासून ५५ ई-चलन प्रलंबित असून, १ लाख ३ हजार रुपये दंड थकीत होता. त्यातील ५१ चलने ओव्हरस्पीडिंगमुळे करण्यात आली होती. या कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी त्याने हे बेकायदेशीर कृत्य केले. परंतु, त्यामुळे तो आणखीनच अडचणीत आला आहे.